वाळूजमहानगर, ता.25 – सलूनच्या दुकानात काम करणाऱ्या एका 25 वर्षीय कारागिराने दुकानातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (ता.25) रोजी सकाळी उघडकीस आली. त्याच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पळशी ता. सिल्लोड येथील प्रभाकर दत्तात्रय बिडवे हा बजाजनगर येथे पत्नी दोन मुलासह राहून वडगाव (को.) येथील श्रीकांत वाघ यांच्या साई जेंंटस पार्लरमध्ये दोन वर्षापासुन काम करत होता. शनिवारी (ता.25) रोजी सकाळी श्रीकांत वाघ हे दुकान उघडण्यासाठी गेले. त्यावेळी आतून दुकान बंद असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी बराच वेळ शटर वाजवले. मात्र आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे वाघ यांनी बाजूला असलेल्या रूमच्या फटीतून आत पहिले असता, प्रभाकर याने पत्र्याच्या अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसले. ही माहिती पोलीसांनी मिळताच पोउपनि. सलिम शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरीकांच्या मदतीने शटरचे कूलूप तोडून बिडवे याला बेशुध्द अवस्थेत खाजगी रुग्णवाहिकेतून घाटीत दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी तपासुन मृत घोषीत केले. या घटनेचे नोंद वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.