वाळूजमहानगर, ता.20 – घरासमोर ट्रक उभी करून चालक घरी झोपण्यासाठी गेले असता चोरट्यांनी 10 हजार रुपये किमतीच्या 2 ट्रकच्या 2 वेगवेगळ्या बॅटऱ्या लंपास केल्या. ही चोरीची घटना रविवारी (ता.19) रोजी सकाळी उघडकीस आली. मात्र फिर्याद देण्यापूर्वीच पोलिसांनी आरोपीला मुद्देमालासह पकडून जेरबंद केल्याने ट्रक चालकाने आपापल्या बॅटऱ्या ओळखल्या.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बजाजनगर येथील बसवेश्वर चौकात रामदास शंकर गायकवाड (वय 38) यांनी त्यांच्या स्वतःच्या मालकीची अशोक लेलन्ड ट्रक (एमएच 14, एचजी – 35 96) 18 जानेवारी रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास राहते घरासमोर लावुन झोपी गेले होते. रविवारी (ता.19) रोजी रोजी पहाटे 5 वाजेच्या सुमारास ते कामावर जाण्यासाठी ट्रक चालू करत होते. मात्र ती चालु न झाल्याने खाली उतरुन बघितले असता त्यांच्या ट्रकची स्पार्क कंपनीची बॅटरी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. तसेच त्यांच्या ट्रक जवळच लावलेली रामेश्वर अवचितराव चव्हाण यांची टाटा कंपनीची एसीइ छोटा हत्ती (एमएच 20, इ जी -6491) या वाहनाची बॅटरी सुध्दा दिसुन आली नाही.
फिर्याद देण्यापूर्वीच आरोपी जेरबंद,
दहा हजाराचा मुद्देमाल जप्त –
या चोरीची फिर्याद देण्यासाठी रामदास गायकवाड व रामेश्वर एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गेले असता त्यांना समजले की, पोलीसांनी एका बॅटरी चोरासस रिक्षा व बॅटरी सोबत पकडले असुन त्याचेकडुन 10 हजार रुपये किमतीच्या दोन बॅटरी जप्त केल्या आहेत. चव्हाण व गायकवाड यांनी जप्त केलेल्या बॅटरी पाहिले असता त्या त्यांच्याच वाहनातील असल्याने लगेच ओळखल्या. या बॅटरी चोरी करणाऱ्याचे नाव शोएब नईम शेख (वय 22) असे असून तो लेबर कॉलनी, कलेक्टर ऑफीस जवळ, छत्रपती संभाजीनगर येथील जम्मुभाई शेख यांच्या घरी किरायाने राहतो.