वाळूजमहानगर, ता.27 – मुलगी डॉक्टर नसतानाही खोटी माहिती देत मुलीचा विवाह एका डॉक्टर सोबत लावून देत त्याची फसवणुक केल्या प्रकरणी बजाजनगर येथील सासर्यासह चौघांविरूध्द न्यायालयाच्या आदेशाने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात शुक्रवारी (ता.27) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळुज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथील डॉ.निलेश दामुजी साठे त्याचे कमळापूर फाटा येथे रुग्णालय आहे. त्याच्या रुग्णालय शेजारी अंकुश कानडे यांचे कापडाचे दुकान असुन ते त्याच्या ओळखीचे आहेत. कानडे यांनी डॉ निलेश यास सांगितले की, माझे मामा रामदास बर्फे यांची मुलगी दीक्षा ही डॉक्टर असून तीचे लग्न करावयाचे असल्याने स्थळ शोधने सुरू आहे. त्यावर निलेश म्हणाले की, मला डॉक्टर मुलीसोबतच लग्न करायचे असून, ती जर डॉक्टर असेल तर मी तयार असल्याचे सांगितले. त्यानंतर कानडे यांनी दिक्षा ही नोयडा येथे बीएएमएसच्या अंतीम वर्षात शिक्षण घेत असल्याचे सांगत तीचा बायोडाटा दिला होता. त्यानंतर काही दिवसांनी कानडे यांनी बर्फे यांना निलेश याच्या रुग्णालयात येऊन दिक्षाच्या लग्नाची मागणी घातली. त्यानंतर नातेवाईकांच्या उपस्थितीत मुलगी पहाण्याचा कार्यक्रम होऊन मुलगी पंसत असल्याचे सांगितले. त्यानंतर दोन्ही कुटूंबियाच्या नातेवाईका समोर कोणत्याही प्रकारचा हुंंडा, दागदागिण्याची देवान घेवाण न करता फक्त लग्न करुन देण्याचे ठरले. 29 जानेवारी 2023 रोजी साखरपुडा तर 31 मार्च 2023 रोजी बजाजनगर येथील आम्रपाली बुध्दविहारात डॉ निलेश व दिक्षा यांचा विवाह झाला. दरम्यान, लग्नानंतर तीन चार महिन्यानी निलेश याच्या रुग्णालयात दिक्षासाठी स्वतंत्र कक्ष तयार करून निलेश याने दिक्षा हीला रूग्णालयाची माहिती देत, महिला रुग्णाची तपासणी करून त्यांच्यावर औषध उपचार करण्यास सांगितले. तेव्हा दिक्षा हिला कोणत्याही रुग्णाची तपासणी करता आली नसल्याने, वैद्यकीय क्षेत्रातील तिला काही येत नसल्याचे उघडकीस आले. त्यानंतर निलेश याने तिला वैद्यकीय शिक्षणाचे कागदपत्रे वेळोवेळी मागीतले. परंतु तीने ते दाखवले नाही. त्यानंतर तीने परिक्षा देण्यासाठी जात असल्याचा बनाव करून माहेरी निघुन गेली. तेथे तिने खोटी माहिती देऊन पती निलेश याच्या विरूध्द मारहाण केल्याची तक्रार ठाण्यात दिली. त्यामुळे डॉ निलेश साठे यांची फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्याने न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने दीक्षा चे वडील रामदास शंकरराव बर्फे, आई वैशाली रामदास बर्फे, डॉक्टर निलेश यांची पत्नी दिक्षा निलेश साठे, पत्नीचे नातेवाईक अंकुश रामनाथ कानडे यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. रावसाहेब काकड हे करत आहेत.