वाळूजमहानगर, ता.20 (बातमीदार) – छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघातील इंद्रप्रस्थ काॅलनीत एक्स-147 दिशा काॅम्प्लेक्समधील सिल्व्हर इन हाॅटेल, बिअर बार, परमिट रूम या दारूच्या दुकानास शासकीय अधिकाऱ्यांनी एकतर्फी परवानगी दिल्याने इंद्रप्रस्थ काॅलनीतील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. दरम्यान, सायंकाळी दारूबंदी विभागाचे निरीक्षक यांनी नागरिकांची भेट घेत दिलेल्या परवानगीची फेर तपासणी करण्याचे आश्वासन दिले.
इंद्रप्रस्थ काॅलनी बजाजनगर येथे होणारे बिअर बार, परमिट रूम, दारूचे दुकान नागरी वसाहतीत असल्याने त्यास परवानगी देण्यात येऊ नये. असे परिसरातील नागरिकांनी वारंवार संबंधित विभागीय अधिकारी यांना तोडी, लेखी देऊन व आंदोलन करून त्याचप्रमाणे आमरण उपोषण करून कळवले होते. तसेच शासनमान्य पहिली ते बारावीपर्यंत असलेली शिवछत्रपती विद्यालय अल्फोन्सा हायस्कूल तसेच इंद्रप्रस्थ काॅलनीतील रहिवासी नागरिकांचा असलेला विरोध याचा कसल्याच प्रकारे विचार न घेता एकतर्फी सिल्व्हर इन हाॅटेलला परवानगी दिली. त्याचप्रमाणे संबंधित अधिकाऱ्यांनी सत्य परिस्थिती न मांडता खोट्या माहितीचा आपल्या मर्जीप्रमाणे अहवाल तयार केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या सगळ्यामुळे इंद्रप्रस्थ काॅलनीतील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. बुधवारी मतदानाच्या दिवशी येथील मतदार केंद्रावर भिरकलेच नाही. ही माहिती मिळताच माजी खासदार चंद्रकांत खैरे, महाविकास आघाडीचे उमेदवार राजु शिंदे यांनी तात्काळ धाव घेतली. यावेळी खैरे यांनी जिल्हाधिकारी तसेच
राज्य उत्पादन शुक्ल निरिक्षक यांना फोन करून आताच्याआता येथील नागरीकांचा प्रश्न निकाली लावण्याचे सांगितले. त्यानंतर दुपारी 4 वाजेच्या सुुमारास पैठण विभागाचे राज्य उत्पादन शुल्क निरिक्षक बगाटे यांनी इंद्रप्रस्थ कॉलनीतील नागरीकांची भेट घेत बियरबार संर्दभात पुन्हा सुनावणी घेऊन प्रश्न निकाली काढण्याचे आश्वसन दिले. त्यानंतर नागरीकांनी टाकलेला बहिष्कार मागे घेत मतदान केले.