वाळूजमहानगर, ता.16 – विधानसभेत प्रश्न विचारत शिक्षकांना शिव्या घालणारे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गप्प का बसले. त्यांचे असे एक तरी भाषण दाखवा की, ते विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भांडले, शेतमालाच्या हमीभावाबाबत भांडले. असा घाणाघात करत तुम्हाला शिक्षकांना शिव्या देणारा पाहिजे की, शिक्षक आमदार पाहिजे? असा प्रश्न अपक्ष उमेदवार डॉ. सुरेश सोनवणे यांनी रांजणगाव (शेणपुंजी) येथे विराट सभेत केला.
विधानसभेची रणधुमाळी सुरू असतानाच गंगापूर खुलताबाद विधानसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार डॉ. सुरेश सोनवणे यांची वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे शनिवारी (ता.16) रोजी विराट जाहीर सभा झाली. या सभेत डॉ. सुरेश सोनवणे यांनी आमदार प्रशांत बंब यांचे नाव न घेता प्रखर टीका करत त्यांचा विकासाच्या गप्पा मारणारा बेगडी चेहरा टराटरा फाडला. या सभेत सोनवणे माता भगिनींना उद्देशून म्हणाले की, तुम्हाला दिलेली दीड हजाराची साडी काही महिन्यात फाटेल. ती शिवताही येईल. परंतु तुमच्या मुलांचे भविष्य फाटले तर ते परत कदापिही शिवता येणार नाही. तुम्हाला वाटलेल्या 1 हजार रुपयांच्या पेटीत तुमच्या गावाचा विकास कोंडून ठेवू शकत नाही. जेव्हा तुम्ही आजारी पडता, तेव्हा उपचार घेण्यासाठी तुमच्या गावात सुसज्ज, सर्व सोयींनी युक्त असा सरकारी दवाखाना म्हणजे घाटी नाही. तुम्हाला छत्रपती संभाजीनगर शहरात जाण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आता वेळ आली आहे. योग्य तो विचार केला नाही तर आपल्या मतदारसंघावर पिढ्यानपिढ्या होणारा अन्याय, अत्याचार थांबणार नाही. माझ्या प्रचाराचा, मला मिळत असलेल्या जनतेच्या प्रतिसादाचा धसका त्यांनी घेतला आहे. मी ज्या गावात बॅनर, पोस्टर लावतो. त्यांचे तर कोणी लावतच नाही. कारण की त्यांच्याकडे लावणारे उरलेच नाही. आणि माझे बॅनर पोस्टर काढण्यासाठी त्यांना टीम लावावी लागली. ही हालत त्यांची झाली आहे. माझे कितीही बॅनर, पोस्टर काढा. माझे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचलेले आहे. त्यांच्या मनात ते बसले आहे. ते तुम्ही कसे काढाल. असा प्रश्न विचारत सोनवणे यांनी जिल्हा परिषदेची शाळा थ्री स्टार लेव्हलची करण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी ते असेही म्हणाले की, मी फाईव्ह स्टार म्हणणार नाही, कारण की, मी बढाया मारत नाही.
भोळ्या भाबड्या जनतेला खोटी आश्वासने मी देणार नाही. गोरगरिबांसाठी असलेल्या दारिद्र्यरेषेचा सर्वे गेल्या 2011 ला झाला होता. त्यानंतर तो अद्यापही करण्यात आला नाही. त्यामुळे गोरगरिबांना मिळणाऱ्या योजना बंद झाल्या. यावर आमदार नाही तर, काय ग्रामपंचायत सदस्य, सरपंच की पंचायत समिती सदस्य आवाज उठवणार आहे. गरिबांचा हक्क हिरावणाऱ्यांना काही वाटत तरी कसे नाही? असा प्रश्नही सोनवणे यांनी विचारत शाळा व शिक्षण सुधारणे, शेतकऱ्यांचे प्रश्न व शेती तंत्रज्ञान प्रशिक्षण केंद्र बनवणे, उद्योग व रोजगार निर्मिती, तालुक्यात आयटी हब तयार करणे, आदर्श तालुका कसा असावा याचे व्हिजन घेऊन मी या निवडणुकीत उतरलो असून मला पाच वर्ष आपली सेवेची संधी द्या. असे आवाहन यावेळी डॉ. सुरेश सोनवणे यांनी केले. अपक्ष उमेदवार डॉ. सोनवणे यांना मिळत असलेल्या जनतेच्या प्रतिसादामुळे तसेच विराट सभांमुळे विरोधकांचे धाबे दणाणले असून त्यांच्या विजयाचे गणित बिघडणार की काय याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.