वाळूजमहानगर, ता.5 – कारची काच फोडून चोरट्यांनी कारमधील लॅपटॉप तसेच स्मार्ट वॉच चोरून नेल्याची घटना सिडको वाळूज महानगरात 21 ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीनंतर घडली.
या विषयी पोलिसांनी सांगितले की, केतन क्षिरसागर (31) रा. सिडको वाळूज महानगर-1, हे वाळूज येथील कास्मो स्पेशालिटी केमिकल या कंपनीत सिनिअर ऑफिसर म्हणून नोकरी करतात. 21 ऑक्टोबर रोजी रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास सजल साहू या मित्राला त्याच्या घरी सोडण्यासाठी कार (एमएच 13,ईके-7165) घेऊन ते सिडको वाळूज महानगरातील योगराज शुभ अपार्टमेंट मध्ये गेले होते. वीस मिनिटांनी ते कार उभ्या केलेल्या ठिकाणी आले असता त्यांना ड्रायव्हर सिटच्या मागची काच फुटलेली तसेच कारमधील 25 हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप तसेच 10 हजार रुपये किंमतीची स्मार्टवॉच कार मधून गायब असल्याचे दिसून आले. या प्रकरणी केतन क्षिरसागर यांनी 3 नोव्हेंबर रोजी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.