February 21, 2025
788
उत्तम फोटोग्राफी कारकिर्दीसाठी बैजू पाटील यांना पद्मश्री मिळायला हवे: सहकारमंत्री अतुल सावे
 
एमजीएममध्ये बैजू पाटील यांच्या फोटोग्राफी प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन
  औरंगाबाद  बैजू पाटील यांनी आपल्या विविधांगी आणि उत्तम दर्जाच्या फोटोग्राफीद्वारे औरंगाबाद शहरासोबत देशाचे नावही जागतिक स्तरावर उज्ज्वल केले आहे. त्यांच्या दर्जेदार कार्यासाठी त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळायला हवा, अशी भावना राज्याचे सहकार आणि ओबीसी कल्याण  मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केली. जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त एमजीएम विद्यापीठाच्या स्कूल ऑफ फोटोग्राफीच्या वतीने जागतिक कीर्तीचे वाईल्डलाईफ फोटोग्राफर बैजू पाटील यांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे 19 ते 22 ऑगस्टदरम्यान आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी सावे बोलत होते.
     याप्रसंगी पोलीस आयुक्त निखील गुप्ता, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर,  एमजीएम संस्थेचे विश्वस्त प्रतापराव बोराडे, सामाजिक शास्त्र विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. रेखा शेळके, जेष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर, माजी उपमहापौर प्रमोद राठोड, एमजीएम विद्यापीठातील विविध विभागाचे विभागप्रमुख, प्राध्यापक, आणि विद्यार्थी उपस्थित होते.
     यावेळी पोलीस आयुक्त निखील गुप्ता म्हणाले, मायकल एंजिलो यांच्या मते, एखाद्या विषयात दहा हजार तास काम केल्यावर प्राविण्यता प्राप्त होत असते आणि बैजू पाटील यांनी ते दहा हजार तास ओलांडून फोटोग्राफी क्षेत्रात प्राविण्यता मिळवली आहे. फोटोग्राफीमध्ये करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न बघण्यासोबतच आवड असलेल्या क्षेत्रात करिअर करावे. कोणत्याही विषयात प्राविण्य मिळवायचे असेल तर त्यासाठी कठोर परिश्रम करण्याचे आवाहन करण्याची गरज असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अथिरा मनिकंदन या विद्यार्थिनीने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विकास भगुरे यांनी सहकार्य केले.
    बैजू पाटील यांचे प्रदर्शन एमजीएमच्या कला दिर्घा आर्ट गॅलरीत 19 ते 22 ऑगस्ट या कालावधीत सकाळी 9 ते रात्री 9 वाजेदरम्यान सर्वांसाठी खुले आहे. या प्रदर्शनाचा सर्वानी लाभ घ्यावा, असे आवाहन एमजीएम स्कूल ऑफ फोटोग्राफीच्या वतीने करण्यात आले आहे.
मंत्री अतुल सावे, पोलीस आयुक्तांनी घेतला फोटोग्राफीचा आनंद
बैजू पाटील यांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उदघाटन झाल्यानंतर मान्यवरांनी प्रदर्शनातील सर्व छायाचित्रांच्या क्लिकमागील संघर्ष आणि कहाणी बैजू पाटील यांच्याकडून जाणून घेतली. दरम्यान, सहकार आणि ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे तसेच पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी कॅमेरा हाती घेत काही फोटो काढत आपल्या आवडीचा उपस्थितांना परिचय दिला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *