वाळूजमहानगर, (ता.27) – वाळूज परिसरातील घाणेगाव येथे वादळी वारा व जोराचा पाऊस आल्यामुळे घरावरील पत्रे उडाली, भिंती पडल्या तसेच फळबागा, सोलर पॅनल उडून तुटून पडल्याने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले. या घटनेचा तलाठी व ग्रामसेवकांकडून पंचनामा करण्यात आला. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणी करण्यात येत आहे.
वाळूज परिसरातील घाणेगाव, रांजणगाव शेणपुंजी, इटावा, नारायणपूर येथे सोमवारी (ता.20) रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस आला. त्यामुळे विद्युत पोल उन्मळून पडले, आंब्याची, लिंबाची झाडे तसेच केळी, मोसंबीच्या फळबागा तुटून पडल्या. यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्याचप्रमाणे गट नंबर नं 225 मध्ये शकुंतला नारायण गायके यांच्या शेतामधील सोलर पॅनल तुटून पडल्यामुळे त्यांचे अंदाजे तीन लाख 52 हजार रुपयाचे नुकसान झाले. तसेच रांजणगाव शेणपुंजी येथील ज्ञानेश्वर सवई यांची केळीची बाग संपूर्ण उद्ध्वस्त झाली. घाणेगाव येथील दत्तू बनकर यांची मोसंबीची बाग पडून नुकसान झाले. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या या नुकसानीचा पंचनामा रांजणगाव (शेपु) च्या कृषी सहाय्यक प्रमिला भांड, घाणेगावचे ग्रामविकास अधिकारी जी एल बोलशेकर यांनी केला.
यावेळी सरपंच केशव सोनाजी गायके, पोलीस पाटील श्याम फाळके, संतोष नारायण गायकवाड, विकास किसनराव काळजे, निवृत्ती विठ्ठल सातपुत यांच्या उपस्थितीत करण्यात आला. वादळी वारा व पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याने या नुकसानीची भरपाई तात्काळ देण्यात यावी. अशी मागणी घाणेगाव येथील शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे