वाळूजमहानगर,(ता.27) – खरीप हंगामाच्या सुरुवातीला विविध विषयांवर कृषी विभागाच्या वतीने मोहीम स्वरूपात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून वाळूज परिसरातील खोजेवाडी येथे शनिवारी (ता.25) रोजी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक दिलीप मोटे यांनी शेतकऱ्यांना हुमणी किडीचा बंदोबस्त करण्याबाबत उपाययोजना सांगून लाईट ट्रॅप लावण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले. तर खोजेवाडीच्या कृषी सहाय्यक वर्षा हिवाळे यांनी शेतकऱ्यांनी खरीप हंगामात बी बियाणे निवड बीज प्रक्रिया बीबीएफ तंत्रज्ञान बियाण्यांची उगवण क्षमता याबाबतीत मार्गदर्शन केले. हा उपक्रम विभागीय कृषी सहसंचालक डॉ तुकाराम मोटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, आत्माचे छत्रपती संभाजीनगर प्रकल्प संचालक बी एस तोर, प्रकल्प उपसंचालक अनिल कुलकर्णी, उपविभागीय कृषी अधिकारी आढाव, तालुका कृषी अधिकारी बापूराव जायभाय, प्रभारी कृषी अधिकारी ज्ञानेश्वर दुर्गुडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. यावेळी खोजेवाडी परिसरातील आत्मा अंतर्गत गटातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.