वाळूजमहानगर, (ता.24) – टेम्पो चोरी करून घेऊन जात असताना चालकाने अपघात केला. त्यामुळे त्याला मारहाण होत असताना टेम्पोच्या शोधात असलेले चालक व मालक तेथे पोहोचले आणि टेम्पोसह आरोपी मिळून आला. त्यानंतर त्याला टेम्पोचं पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. हा प्रकार बुधवारी (ता.22) रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाळूज औद्योगिक वसाहतीतील संतोष भानुदास नरोडे यांच्या नरोडे ट्रान्सपोर्टचा एक लाख रुपये किमतीचा टेम्पो (एम एच 04, सी ए -8784) वाळूज औद्योगिक वसाहतीतील इ सेक्टरमधील व्हेरॉक कंपनीच्या गेटवर उभा होता.तेथून हा टेम्पो चोरी झाल्याचे बुधवारी (ता.22) रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास उघडकीस आले. त्यानंतर संतोष नरोडे यांनी जीपीआरएस सिस्टीम तपासले असता चोरी झालेला टेम्पो रांजणगाव फाट्याकडे जात असल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी लगेच टेम्पो चालक अमिन शेख यांच्या मदतीने टेम्पोच्या शोध सुरू केला. दरम्यान टेम्पो चोरी करून घेऊन जात असताना चालकाने अज्ञात वाहनाला धडक दिल्याने त्याला रांजणगाव फाट्यावर संतप्त जमाव मारहाण करत होता. त्यामुळे संतोष नरोडे व अमीन शेख यांनी जमावाच्या ताब्यातून टेम्पो चालकाला सोडवत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर जखमी टेम्पो चोराला टेम्पोसह पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याची विचारपूस केली असता गजानन भास्कर औटी, वय 24 वर्षे रा. पिंपळवाडी पिराची, ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर असले असे असल्याचे सांगितले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.