वाळूजमहानगर, (ता.21) – वाळूज परिसरातील रांजणगाव, घाणेगाव, इटावा, जोगेश्वरी या परिसरात सोमवारी (ता.20) रोजी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसासह जोराचा वारा आला. त्यामुळे घरावरील पत्रे उडाली, झाडे उन्मळून पडली. तसेच घाणेगाव येथील दोन शेतकऱ्यांच्या गाई जखमी होऊन दगावल्या. शिवाय कांदाचाळीसह शेतमालाचे मोठे नुकसान झाले. या अवकाळी वादळामुळे परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे.
वाळूज परिसरात सोमवारी (ता.20) रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास अवकाळी पावसासह वादळी वारा आला. या अवकाळी पावसामुळे व वादळी वाऱ्यामुळे रांजणगाव (शेणपुंजी), जोगेश्वरी, घाणेगाव, इटावा गावासह शेतामधील अनेक झाडे उन्मळून पडली. तसेच घाणेगाव येथील पंचशीलनगर, संघर्षनगर येथे अनेकांच्या घरावरील तसेच कांदा चाळीवरील पत्रे उडून मोठे नुकसान झाले.
दोन गाई दगावल्या एक जखमी –
या वादळी वाऱ्यामुळे झाड पडल्याने घाणेगाव येथील सागर सातपुते यांची एक गाय झाडाखाली दबून दगावली. तसेच माणिकराव गायके यांच्या कांदा चाळीच्या शेडवरील पत्रे उडाल्याने ते गाईला लागून गंभीर जखमी झालेल्या एका मृत्यू झाला. तसेच इतर अनेक जनावरे देखील जखमी झाले. तसेच पत्रे उडाल्याने व झाडे पडल्याने काही घरांच्या भिंतीचेही नुकसान झाले आहे.
अंधारात काढली रात्र –
या वादळी वाऱ्यानमुळे घाणेगाव परिसरात गट नंबर 245, 246 तसेच नांदेड येथून येणाऱ्या मेन लाईनचे 20 ते 25 विद्युत पोल तुटून पडले. यामुळे घाणेगाव येथील विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे रात्रभर घाणेगाव येथे अंधाराचे साम्राज्य होते. हा विद्युत पुरवठा सुरळीत झाला नसल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे.
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान–
या वादळे वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडाल्याने त्यांचे संसार उघड्यावर पडले. तसेच शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवण्यासाठी लाखो रुपये खर्च करून पत्र्याची शेड (कांदा चाळ) बनवले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा ठेवला होता. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी बांधलेले शेड (कांदा चाळ) उडाले. त्यामुळे कांदाला पावसाचे पाणी लागून कांदा खराब झाला. शकुंतला गायके यांचे सोलार पॅनल उडून नुकसान झाले. दत्तू बनकर यांच्या मोसंबीच्या बागेतील 65 ते 70 झाडे उनमळून पडल्याने नुकसान झाले. तसेच इतरही अनेक शेतकऱ्यांचे या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.
घाणेगाव येथे निर्जळी-
सोमवारी सायंकाळी झालेल्या जोरदार वाऱ्यासह वादळी पावसामुळे अनेक विद्युत बोलवून मिळून पडल्याने येथील वीज पुरवठा खंडित झाला परिणामी गावातील पाणीपुरवठा बंद झाला त्यामुळे गावात मंगळवारी दिवसभर निर्जळी होती अनेकांनी खाजगी टँकर बोलून कशी तरी तहान भागवली.
नुकसानीचा पंचनामा –
दरम्यान घाणेगाव येथे वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाल्याने या सर्व घटनेचा तलाठी संदीप पवार, ग्रामसेवक जी एल बोळशेकर, कृषी सहाय्यक प्रमिला भांड, सरपंच केशव गायके, उपसरपंच सुधाकर गायके यांच्याकडून पंचनामा करण्यात आला. यामध्ये दत्तू बनकर, निवृत्ती काळवणे, लक्ष्मण काळवणे, ज्ञानेश्वर गायके, किशोर क्षीरसागर, राहुल गायके, सोपान गायके, संदीप काळवणे, किरण रोकडे, संजय दणके, निखिल गोपने यांच्या घरावरील पत्रे उडाल्याची नोंद आहे.