वाळूजमहानगर, ता.17) – बजाजनगर येथे झालेल्या दोन दिवसीय 44 व्या मराठवाडा साहित्य संमेलनात विविध ठराव घेण्यात आले. प्रथम समाज, साहित्य, संस्कृती आणि कला या क्षेत्रात विशेष कर्तृत्व सिध्द करणाऱ्या व्यक्तींच्या झालेल्या निधनामुळे त्यांना श्रद्धांजली वाहून शोक व्यक्त करण्यात आला. त्यानंतर विविध ठराव घेण्यात आले.
यामध्ये ठराव क्र. 1- महाराष्ट्रातील राष्ट्रीय बँका, अल्पभूधारक आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना योग्य हमीसाठी कर्ज देण्यास टाळाटाळ करतात म्हणून अशा शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने कर्ज हमी द्यावी आणि ज्या बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करतात त्यांना कडक शब्दांत आदेश द्यावा. या ठरावाला सुचक म्हणून प्राचार्य राहुल हजारे तर
अनुमोदक डॉ. गणेश मोहिते होते.
ठराव क्र. 2- भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने मराठवाड्याकडे कायम दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे मराठवाड्यातून जाणारे सर्व रेल्वे मार्ग दुहेरी करावेत. तसेच मराठवाड्यातील रेल्वे मार्ग रेल्वेच्या मध्य विभागाशी जोडण्यात यावेत. या ठरावास सूचक – प्राचार्य दीपा क्षीरसागर तर अनुमोदक – सुभाष कोळकर होते.
ठराव क्र. 3- कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याचे हक्काचे 22 टीएमसी पाणी मराठवाड्यास देण्यास नेहमीच पश्चिम महाराष्ट्रातील नेते विरोध करीत असतात. समन्यायी पाणी वाटपाच्या नियमानुसार मराठवाड्यास 22 टीएमसी पाणी प्रत्येक वर्षी विनाविलंब देण्यात यावे. सूचक – विवेक जैस्वाल
अनुमोदक – कुंडलिक अतकरे.
ठराव क्र. 4 – शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा यासाठी महाराष्ट्रात अनेक शेतकरी आंदोलने सुरू आहेत. परंतु अद्यापही शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मालाला व त्याच्या घामाला प्रतिष्ठा मिळत नाही. जागतिक स्तरावरील बाजारपेठेच्या किंमतीचा मोठा प्रभाव स्थानिक बाजारपेठेवरही पडतो. सरकार कोणतेही असले तरी त्याची आयात निर्यातीची धोरणे शेतमालांच्या किमती कोसळतात आणि पर्यायाने शेतकऱ्यांच्या अरिष्टास कारणीभूत ठरतात. भारतीय शेतकऱ्यांना बाजारपेठेचा योग्य तो लाभ मिळण्यात सरकारची आयात निर्यात धोरण हेच प्रमुख अडसर आहेत. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत सरकारने हा अडसर दूर करावा. आणि सरकारी हस्तक्षेप दूर करून शेतकऱ्याला खुला अवकाश प्राप्त करून द्यावा. देविदास फुलारी यांनी सुचविलेल्या या ठरावास डॉ. हेमलता पाटील यांनी अनुमोदन दिले. यासह विविध विषयावर एकूण 11 ठराव या साहित्य संमेलनात घेण्यात आले. यावेळी कौतिकराव ठाले पाटील, भीमराव वाकचौरे, विजय राऊत, अनंत कराड, विलास राऊत, ऋषिकेश कांबळे, शिवानी राऊत, डॉ. रामचंद्र काळुंखे, मोहिब कादरी, डॉ. दिलीप बिरुटे, संतोष तांबे आदींची प्रमुख उपस्थिती होती.