
वाळूजमहानगर, (ता.27)- अज्ञात दरोडेखोरांनी तीक्ष्ण हत्याराने दोघांना मारहाण करत महिलेच्या कानातील सोन्याचे दागिने ओरबाडून फरार झाले. यावेळी दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत 75 वर्षीय वृद्ध ठार झाला. तर गंभीर जखमी झालेल्या 40 वर्षीय महिलेवर घाटीत उपचार सुरू आहे. ही घटना शनिवारी (ता.27) रोजी मध्यरात्री 12.30 वाजेच्या सुमारास शेंदूरवादा येथे घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नारायण पंढरिनाथ निकम वय 75 वर्ष व त्यांची सून अन्नपुर्णा नानासाहेब निकम वय 40 वर्ष असे शेंदुरवादा, ता. गंगापूर जिल्हा छत्रतपी संभाजीनगर येथील गावाजवळील शेत वस्तीवर राहतात. शेती कामावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. 
अन्नपूर्णाबाई यांचे पती नानासाहेब निकम हे 5 वर्षापुर्वी मरण पावलेले आहे. त्यांना एक मुलगा किर्तीक निकम वय 23 वर्ष असा असुन तो शेंद्रा एम.आय.डी.सी येथे कंपीनीत कामाला जातो. तो तिकडेच पाहुण्याचे घरी राहतो. व अधुन मधुन घरी येत असतो. तसेच एक सोनाली नावाची मुलगी असुन तीचे लग्न झाले आहे.
शुक्रवारी (ता.26) रोजी नेहमीप्रमाणे रात्रीचे जेवण केल्यानंतर नारायण निकम हे घरासमोर बाजेवर झोपले हेाते. तर अन्नपूर्णाबाई निकम या घरात झोपलेल्या होत्या. रात्री 12.30 वाजेच्या सुमारास घराचा दरवाजा बाहेरुन कोणीतरी वाजवला. तेव्हा कोण आहे असे अन्नपूर्णाबाईने विचारले असता कोणीही प्रतिसाद दिला नाही. पुन्हा जास्त दरवाजा वाजु लागला म्हणुन दरवाजा उघडला असता अन्नपूर्णा निकम यांच्या गळ्यावर अचानक काहीतरी मारले व दोन्ही कानातील सोन्याचे फुले ओरबडुन तोडले. व गळ्यातील सोन्याचे काळे मणी व सोन्याचे 30 मणी असलेली पोत तोडुन पळाले. त्यानंतर आरडाओरड करुन त्या घराबाहेर आल्या असता त्यांचे सासरे नारायण निकम हे रक्ताच्या थारोळ्यात जखमी व बेशुध्द अवस्थेत पडलेले दिसले.
त्यानंतर अन्नपूर्णा बाईने घरापासुन काही अंतरावर राहणारे चुलत पुतण्या गणेश निकम याचे घरी पळत जावुन आपबीती सांगितली. त्यानंतर रामेश्वर निकम व नातेवाईकांनी दोघांनाही घाटीत दाखल केले असता नारायण निकम यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले तर अन्नपूर्णाबाई निकम यांच्यावर गाठीत उपचार सुरू आहेत. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरवाजा तोडण्याचा प्रयत्न –
घराबाहेर झोपलेल्या नारायण निकम यांना मारहाण करून गंभीर जखमी केल्यानंतर ते बेशुद्ध पडले. त्यानंतर दरोडेखोरांनी घराचा दरवाजा ठोठावला. तो दरवाजा उघडत नसल्यामुळे दरोडेखोरांनी कुराडी सारख्या हत्याराने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला.
घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा –
शेंदूरवादा येथे दरोडा पडला असून या घटनेत एक ठार तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळताच वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र सहाने हे फौजफाट्यासह घटनास्थळी धावले. दरम्यान पोलीस उपायुक्त नितीन बगाटे, गुन्हे शाखेचे संदीप गुरुमे यांच्यासह स्वानपथकानेही घटनास्थळी धाव घेत दरोडेखोरांचा माग काढण्याचा प्रयत्न केला.
