वाळूजमहानगर (ता.25) :- आंघोळीसाठी हीटर लावलेल्या बकेटमधील गरम पाण्याच्या पडून गंभीररित्या भाजलेल्या 4 वर्षीय चिमुकलीचा उपचारादरम्यान शुक्रवारी (ता.25) रोजी मृत्यू झाला. ही घटना वाळूज परिसरातील साईनगर, कमळापूर येथे घडली.
परभणी येथील राजेश शिंदे हे पत्नी सिमा, आई-वडील, चुलता तसेच 7 वर्षाचा मुलगा व 4 वर्षीय मुलगी यांच्यासह राहतात. त्यांची पत्नी डिलिव्हरीसाठी माहेरी गेली आहे. तर मुलगी श्रेया त्यांच्याजवळ राहत होती. बुधवारी (ता.23) रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास राजेश शिंदे यांनी प्लास्टिकच्या बकेटमध्ये हिटर लावले होते. घरात आई-वडील भाऊ सर्व कुटुंब होते. जेवन झाल्यानंतर श्रेया हात धुण्यासाठी गेली असता पाय घसरुन ती हिटर लावलेल्या गरम पाण्याच्या बकेटमध्ये पडली. कुटुंबियांनी तातडीने तिला घाटीत दाखल केले. गंभीर भाजलेल्या श्रेयावर उपचार सुरू असताना तीचा शुक्रवारी (ता.25) रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. याप्रकरणी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल कारभारी गाडेकर हे करीत आहेत.