
वाळूजमहानगर, (ता.13) – “प्रयत्न करिता वाळूतून तेलही गळे” या उक्तीप्रमाणे प्रयत्न जर केला तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. हीच उक्ती राज्यातील 111 दिव्यांगांनी प्रत्यक्षात उतरवली. ती म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई सर करून. थंडी, वारा व धोकादायक चढाई करून या दिव्यांगांनी नववर्षाच्या सूर्योदयाचे स्वागत कळसुबाई शिखरावर केले. दिव्यांगांच्या या धाडसी साहसाचे राज्यभर कौतुक होत आहे.
‘हम भी कुछ कम नही’, हा हेतू उराशी बांधून राज्यातील 111 दिव्यांग एकत्र आले. आणि त्यांनी काहीतरी वेगळे करण्याची खूणगाठ बांधली. त्यात कळसुबाई हे सर्वोच्च शिखर सर करण्याची संकल्पना समोर आली आणि त्यास सर्वांनीच एकमताने होकार दिला. आणि शिवुर्जा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोहीम फत्ते केली.
शिवुर्जा प्रतिष्ठान दरवर्षी धाडसी दिव्यागांना सोबतीला घेऊन महाराष्ट्रातील अत्युच्च कळसुआई शिखरावर नव वर्ष स्वागत करत असते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली व बीड येथील दुर्गभटके शिवुर्जा प्रतिष्ठान सचिव कचरू चांभारे यांच्या नियोजनाखाली यावर्षी ही मोहीम पार पडली. यावर्षी मोहिमेचे अकरावे वर्ष होते. व बीड जिल्ह्यातील सहा दिव्यांगांसह राज्यातील औरंगाबाद, नाशिक, पुणे, ठाणे, मुंबई, सांगली, लातूर, नांदेड, सोलापूर, गडचिरोली,वर्धा, अकोला, अमरावती, वाशिम, अहमदनगर, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, बुलढाणा, नागपूर आदी जिल्ह्यातील दिव्यांग सहभागी झाले होते.
31 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत सर्व दिव्यांग बारी व जहांगीरवाडी गावातून माची मंदीरावर एकत्र आले. या ठिकाणी एकमेकांशी परिचय करून दुपारी 2 वाजता प्रत्यक्ष शिखराकडे चढाईला सुरुवात झाली. कळसुआई हे शिखर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असून 5 हजार 400 फुट उंचीचे आहे. खडी चढाई, खोल दरीच्या बाजूने चिंचोळा रस्ता, माळरान, मोठे मोठे दगड असलेल्या लोखंडी शिडी अशी विविधता असलेली ही वाट खडतर आहे.
सहभागी दिव्यांगांत 25 मुली व महिला तसेच 15 व्यक्ती 100 टक्के अंध होते. कृत्रीम पाय असलेले तीन व एकच पाय असलेल्या दोन दिव्यांगांचा समावेश होता. रात्री 7 वाजेपर्यंत सर्व दिव्यांग कळसुआई शिखराजवळील विहीरीजवळ पोहचले. याठिकाणी कडाक्याच्या थंडीत कापडी तंबूत मुक्काम केला.
रविवारी (ता.1) जानेवारी रोजी पहाटे लवकर उठून शेवटची लोखंडी शिडी सर करून कळसुआई मातेचे दर्शन घेतले. व सर्वोच्च शिखरावरून नव्या वर्षाच्या नव्या सूर्योदयाचे जल्लोषात स्वागत केले. दिव्यांग मंत्रालय निर्मितीबद्दल आमदार बच्चूभाऊ कडू व महाराष्ट्र सरकारचे आभार मानले.
सकाळी नऊ वाजता शिखर उतरणीला सुरूवात केली. कालचीच कठीण चढाई उतरत दुपारी 1 वाजता माची मंदिराजवळ पोहचले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर विजयी आनंदाची छटा होती. या धाडसी मोहिमेचा आनंद दिल्याबद्दल सर्वांनी शिवुर्जा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी गाडे व सचिव कचरू चांभारे यांना धन्यवाद दिले. शिवुर्जाच्या उपक्रमाचे कौतुक केले. नाशिक रायडर्स ग्रूपने तर सर्व दिव्यांगावर गुलाब पाकळ्यांची उधळण केली, तोफा वाजवून सहभागींचे स्वागत केले.
माची मंदिरावर सर्व दिव्यांगांना सहभाग प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. दिव्यांगांसाठी प्रेरणादायी कार्य करणाऱ्या 6 व्यक्तींना शिवुर्जा प्रतिष्ठान कडून ऊर्जा पुरस्काराने गौरविण्यात आले. डाॅ.अनिल बारकुल बीड, पारसचंद साकला औरंगाबाद (वाळूज), आरती लिमजे मुंबई, सुभाष सज्जन नांदेड, प्रा.डॉ.सोमनाथ पंचलिंग नांदेड, सतिश आळकुटे पुणे, काजल कांबळे सांगली यांना पुरस्कार देण्यात आला. बीड येथील कचरू चांभारे, पांडुरंग उनवणे, कल्याण घोलप, संतोष आघाव, पद्मिन तारडे, वैजनाथ देवळकर हे 6 दिव्यांग सहभागी होते.
मोहीम यशस्वी करण्यासाठी शिवाजी गाडे पैठण, कचरू चांभारे बीड, अंजली प्रधान, सागर बोडखे नाशिक, जगन्नाथ चौरे ठाणे, डॉ.अनिल बारकुल बीड, सतिश आळकुटे पुणे, जीवन टोपे पुणे, मच्छिंद्र थोरात शिरूर, केशव भांगरे नगर यांनी विशेष परिश्रम घेतले. या मोहिमेत मदतनीस म्हणून बीड येथील एकनाथ भालेकर, शिवराम पवार, अंगद उबाळे, मनोज पोपळे यांनी सहकार्य केले.
