
वाळूजमहानगर, (ता.14) – आपण सर्वसामान्य कुटुंबातून आलो आहोत. आपल्या पाल्याचे उज्वल भवितव्य घडावे, म्हणून पालक अहोरात्र मेहनत करत असतात. वेळेप्रसंगी स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून आपल्या पाल्याचे स्वप्न पूर्ण करण्यात आयुष्य झिजवत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनो स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून आई-वडिलांचे स्वप्न साकार करा. असे प्रतिपादन पत्रकार शिवाजीराव बोडखे यांनी केले.
बजाजनगर येथील राजा शिवाजी महाविद्यालयात गुरुवारी (ता.12) रोजी राष्ट्रमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरा करण्यात आली. यावेळी बोडखे हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. ते म्हणाले की, स्वामी विवेकानंद यांनी सांगितल्या प्रमाणे आपण ठरवलेले ध्येय प्राप्त होत नाही, तोपर्यंत मेहनत व कठोर परिश्रम करा. प्रयत्नात सातत्य ठेवल्यास तुम्ही नक्कीच जीवनात यशस्वी व्हाल.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सहसचिव अमन जाधव तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवव्याख्याते कुमार बिरदवडे, पत्रकार शिवाजीराव बोडखे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ.वैद्य, प्राचार्य डॉ. एस एस कादरी, प्रशासकीय अधिकारी बी.बी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शिवव्याख्याते कुमार बिरदवडे यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे विचार आचरण्यात आणण्याची गरज असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्य डॉ.एस.एस.कादरी यांनी सूत्रसंचालन संस्कृतिक विभाग प्रमुख जयश्री शेजुळ तर आभार विद्या उगले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वि के मालोदे, अनिता बोबडे, नाना इंगळे, ए .जी. चौधरी, एस. के. खरात, के.पी. मोरे व अशोक जगताप, प्रकाश सोनवणे यांनी परिश्रम घेतले.
