February 5, 2026

वाळूज महानगर, (वार्ताहर) – स्त्रियांना कमी समजू नका, आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया आपले स्थान बळकट करत आहेत. नोकरी पासून ते थेट राजकारणापर्यंत सर्वत्र महिला त्यांची योग्यता सिद्ध करत आहेत. असे असतानाही स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत कमी लेखू नका. स्त्री भ्रूण हत्या करू नका. असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची पुतणी (भावाची कन्या )हभप कु. शिवांजली जरांगे पाटील यांनी केले.

वाळूज महानगराचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर येथे बुधवारी 31 डिसेंबर रोजी सकाळी भागवत (पुत्रदा) एकादशी निमित्त आयोजित भव्य कीर्तन सोहळ्यात हभप जरांगे बोलत होत्या. याप्रसंगी त्यांनी संत जनाबाई यांचा……

नाम विठोबाचे घ्यावे/
मग पाऊल पुढे टाकावे//1//
नाम तारक हे थोर/
नामे तरिले अपार//2//
अजामेळ उद्धरिला /
चोखामेळा मुक्तिस नेला//3//
नाम दळणी कांडणी/
म्हणे नामयाची जनी//4//
हा अभंग किर्तन सेवेसाठी घेतला होता. या अभंगाचे निरूपण करताना हभप जरांगे कीर्तनातून उपदेश देताना म्हणाल्या की, संत जनाबाई वयाच्या सहाव्या वर्षीच श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला त्यांच्या वडिलांसोबत गेल्या होत्या. तेव्हा विठ्ठलाचे सुंदर स्वरूप पाहून संत जनाबाईंनी पंढरपुरातच राहण्याचा निश्चय केला. त्या संत नामदेवाच्या घरी राहून जात्यावर दळण करत होत्या. संत जनाबाई धान्य दळतांना मुखाने विठ्ठल भक्तीचे अभंग गात असत. संत जनाबाईची भक्ती व श्रद्धा पाहून साक्षात भगवंत पांडुरंग संत जनाबाईच्या झोपडीत काही काळ वास्तव्यास होते. तेव्हा विठ्ठल भगवंत संत जनाबाईस घरकामात सुद्धा मदत करत होते. प्रथम पुत्रदा एकादशी निमित्त बुधवारी पहाटे श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीला गोपाल भागचंद मगर यांच्या हस्ते सपत्नीक महाभिषेक व संत पूजन करण्यात आले. कीर्तन सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी मंदिर कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र पवार, सचिव आप्पासाहेब झळके व सर्व विश्वस्त, गायनाचार्य, टाळकरी, मृदंगाचार्य आणि पंढरपूर व वळदगाव येथील ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. किर्तन सोहळ्यात पंचक्रोशीतील अनेक गावातील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *