
वाळुज महानगर, (ता.8) – भरधाव जाणाऱ्या स्कार्पिओने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील एकाच कुटुंबातील 3 जण गंभीर जखमी होऊन ठार झाले. हा अपघात सोमवारी 8 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास गंगापूर वैजापूर रोडवर झाला. 
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सटाणा ता. वैजापूर येथील सजन राजु राजपुत (वय 28 वर्ष), पत्नी शितल सजन राजपुत (वय 25 वर्षे व मुलगा कृष्णांश सजन राजपुत (वय 1 वर्षे) हे कुटुंब सिध्दिविनायक ए, कमलापुर रोड, गणेश वसाहत वाळुज ता. गंगापूर येथे राहत होते. 
सोमवारी 8 सप्टेंबर रोजी सजन राजू राजपूत हे पत्नी व मुलासह दुचाकी (एमएच 20, सी क्यू -0766) वरून जात असताना राजपूत यांच्या दुचाकीला स्कार्पिओ (एमएच 19, बी यु -4214) च्या चालकाने त्याच्या ताब्यातील स्कार्पिओ भरधाव व निष्काळजीपणे चालवून राजपूत यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.
सकाळी 8 वाजेच्या सुमारास गंगापूर वैजापूर रोडवरील वरखेड फाट्याजवळ झालेल्या या अपघातात सजन राजपूत, शीतल राजपूत व कृष्णांश राजपूत हे तिघेही गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक अनिकेत मुळक व सागर शेजवळ यांनी तात्काळ अपघातस्थळी धाव घेत सर्व जखमींना उपजिल्हा रुग्णालय गंगापूर येथे दाखल केले.
मात्र उपचारापूर्वीच तिघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या अपघाताची शिल्लेगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एल एफ भोजने करीत आहे.
