वाळूजमहानगर (ता. 9) :- पोहरागड येथे 12 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सोहळ्यानिमित्त मुंबईवरून निघालेल्या सेवा ध्वज रथाचे वाळुज महानगरात गुलाबपुष्पवृष्टीचा वर्षाव करत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. सेवा ध्वज रथ पोहरागड येथे रवाना होत आहे. तो महाराष्ट्रातील बंजारा समाज बांधवाची वस्ती असलेल्या गावांना ही भेटी देत आहे.
मुंबई येथील ज्ञानपीठ लोधिवली संत रामराव बापू यांच्या शांती स्थळावरून निघालेल्या या सेवा ध्वज रथाचे वाळूज औद्योगिक नगरीतील संत सेवालाल महाराज यांच्या मंदिर स्थळावर आगमन झाले असता बंजारा समाज बांधवांनी सेवा ध्वज रथाचे गुलाबपुष्पवृष्टीचा वर्षाव करत स्वागत केले. 12 फेब्रुवारीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार असून तेथे सेवा ध्वजची स्थापनाही करण्यात येणार आहे. यावेळी संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत जितेंद्र महाराज तसेच मंत्री संजय राठोड यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमास देशातून 14 ते 15 लाख बंजारा बांधव उपस्थिती दर्शवणार असून गेल्या अनेक वर्षापासून बंजारा समाजाचे प्रलंबित असलेले प्रश्नही यावेळी सरकारसमोर मांडले जाणार असल्याची माहिती संत सेवालाल महाराज यांचे वंशज महंत जितेंद्र महाराज यांनी दिली.
