वाळूजमहानगर, (ता.22) – वारकरी संप्रदायातील जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगातून सर्वांनी बंधुत्वाने राहावे, वागावे असा उपदेश केला. तर श्री साईबाबांनी आपण सर्वजण एक आहोत यासाठी ‘सबका मालिक एक’ असा संदेश दिला. म्हणून संत तुकाराम यांच्या व साईबाबांच्या उपदेशात साम्य दिसून येते. त्यामुळेच वारकरी संप्रदायाचे व श्री साईबाबांचे तत्व एकच असल्याचे मत हभप गुरुवर्य बद्रीनाथ महाराज नवल तात्या (वेदांताचार्य), अध्यक्ष गीता भवन वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र पैठण यांनी व्यक्त केले.
वाळूज महानगरातील बजाजनगर येथे ‘गुडइयर टायर्स’ या कंपनीतील कामगारांच्या पुढाकाराने 52 घरांच्या या हाउसिंग सोसायटी परिसरात भव्य श्री साई मंदिर उभारण्यात आले. येथे श्री साई मंदिर संस्थान ट्रस्टच्या वतीने मंदिर परिसरात 33 व्या मंदिर वर्धापन दिनानिमित्त 19 व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. शनिवारी (ता.22) रोजी काल्याचे कीर्तनाचे पुष्प हभप नवले महाराज यांनी गुंफले. यावेळी ते भाविकांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, हा साईंचा दरबार सर्वांसाठी खुला आहे. येथे सर्वांना समानतेची वागणूक मिळते.
तुझ्या संगती, झाली आमची निश्चिंती,
ना देखीले ते मिळे, भोग सुखाचे सोहळे,,
या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचे निरूपण त्यांनी या गोपालकाला निमित्त आयोजित कीर्तनात केले. गोपाल काल्याचे किर्तन हे भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रावर प्रकाश टाकणारे असावे असा नियम आहे. त्यामुळेच भगवान श्रीकृष्णाच्या काळात गोपाळांनी भगवान श्रीकृष्णाजवळ केलेल्या वर्णनाचा आधार घेत संत तुकाराम महाराजांनी रचलेला हा अभंग आजच्या कीर्तनासाठी निवडला असे ते म्हणाले. भगवान श्रीकृष्ण हे नेहमी आठ या आकड्याला शुभ समजत होते. त्यांच्या अवतारात महत्त्वाच्या प्रसंगी आठ आकड्याचे महत्व वेळोवळी दिसून येते. याविषयी त्यांनी उपस्थितांना विस्तृत माहिती दिली. मात्र आपण संसारात आठ हा आकडा अशुभ समजतो ‘आठ आणि घाट ‘असा आपला गैरसमज आहे. पूर्वीच्या काळी ग्रामीण भागात शेतातील धान्याच्या खळ्यावर शेतकरी तयार झालेले धान्य मोजताना एक ते सात म्हणायला मागेपुढे कधीच बघत नव्हते, पण आठ हा आकडा येताच ते आठ ऐवजी राम म्हणत होते. गावातील सुतार हे गाठीचे लाकूड लाकडी अवजारे तयार करण्यासाठी घेत नव्हते. ‘तुका म्हणे सोडविल्या गाठी’ या बोध वचनाप्रमाणे आपण आपल्या जीवनातील गाठी सोडवल्या तरच आपणास भगवंताजवळ जाता येते. या किर्तनाला भाविकांची शेकडोंच्या संख्येने उपस्थिती होती. विशेषतः महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. हा सप्ताह
हभप रामेश्वर महाराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. प्रथम सकाळी साई मंदिर येथून जयभवानी मार्गे साई पालखीसह भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत भजनी मंडळाच्या टाळ मृदुंगाचा गजर, व साईंचे भजने ऐकून बजाजनगरातील भाविक मंत्रमुग्ध झाले. निवडणुकीत अनेक साई भक्त व महिलांनी नृत्य केले तसेच फुगड्या खेळल्या. मिरवणुकीच्या प्रसंगी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ही पालखी मिरवणूक साई मंदिर संस्थान ट्रस्ट बजाजनगर येथून काढण्यात आली होती.
मंदिर परिसरात सकाळी नऊ वाजता नवचंडी याग झाला. यावेळी मयूर बांगर, नीता बांगर, व्यंकटराव मल्हारे, द्रोपदाबाई मल्हारे, किरण आडे, सोनल आडे, आकांक्षा आडे या यजमानांच्या हस्ते व श्री साई मंदिराचे मुख्य पुजारी सुधाकर जोशी यांच्या नेतृत्वाखालील पुरोहित संघाने विधिवत पूजा अर्चा केली. अजय कडूबाळ, प्रीती लांडे, संजय जैतमल व भाविक यावेळी उपस्थित होते. तसेच महात्मा गांधी मिशन (एमजीएम) ब्लड बँकेच्या वतीने रक्तदान शिबिर, केवळ 20 रुपये तपासणी शुल्क घेऊन नेत्र तपासणी, मोफत दंतरोग निदान शिबिर, तसेच निःशुल्क वजन घटविण्याच्या उपाययोजना आदि सामाजिक उपक्रम झाले. आरोग्य कीर्तनकार डॉ. एमडी संकपाळ यांनी आरोग्य विषयक जनजागृती केली. महाप्रसाद वितरणाने समारोप करण्यात आली. सप्ताहाच्या यशस्वीते साठी श्री साईबाबा मंदिर ट्रस्टचे संजीव तायडे, डी. पी.शिंदे, बापू चव्हाण, राधाकृष्ण पालवे, आप्पा खोडवे, अण्णा बोंद्रे, आप्पा बडक, नारायण गरड, सुरेश गीते, परमेश्वर पालके, हरिभाऊ खंडागळे, तुकाराम नागरे, नवनाथ खोडवे, रामकृष्ण चव्हाण, श्रीमंत बोंद्रे, अशोक आगळे, नारायण गरड, परमेश्वर पालवे, साईनाथ चव्हाण, गणेश गीते, वैष्णव गरड, साई पोपळघट, साई चव्हाण, साई पालवे, साई गुणाले, प्रवीण देशमुख, यांच्यासह महिला मंडळाच्या रितू मंडल, वनिता जाधव, रोहिणी चव्हाण, सुनिता गरड, मथुरा खैरनार, रेणुका बडक, सुशीला ठाकूर, कल्पना काळे, वंदना खांडवे, स्वाती पालवे यांच्यासह सर्व साई भक्तांनी सहकार्य केले व परिश्रम घेतले.