वाळूजमहानगर, ता.3 – वाळूज औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीचे सहलीला गेलेल्या कामगारांच्या बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उलटली. या अपघातात एक जण जागीच ठार, तर 30 च्या वर कामगार जखमी झाले. जखमीतील 4 कामगारांची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात गोव्याहून येताना कोल्हापूरजवळ रविवारी (ता.2) रोजी मध्यरात्री झाला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाळूज औद्योगिक वसाहतीतील एएसआर या कंपनीचे कर्मचारी आणि कामगार मिळून जवळजवळ दीडशे कामगार सहलीसाठी खाजगी बस ( डी डी 01, टी -9333) ने गोव्याला गेले होते. गोव्यावरून छत्रपती संभाजीनगर (वाळूज)कडे येणारी आराम बस करवीर तालुक्यातील कांडगाव येथे रविवारी (ता.दोन) रोजी मध्यरात्री उलटली. या अपघातात बस मधील अमोल परशुराम भिसे या कामगाराचा मृत्यू झाला. तर 30 कामगारांपेक्षा अधिक जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक गावकऱ्यांनी तात्काळ धाव घेत सर्व जखमींना उपचारार्थ कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल केले. जखमींपैकी 4 कामगारांची प्रकृती चिंताजनक आहे.
जखमींची नावे अशी –
रूपाली कटारे (वय 32), शाहरुख शेख (वय 30), शुभम चव्हाण (वय 30) आणि समाधान उबाळे (वय 32) अशी जखमींची नावे आहेत. जखमी पैकी आणि इतर बसमधील काही कामगार सुखरूप घरी परतल्याची माहिती ए एस आर कंपनीच्या वतीने देण्यात आली.
वळण घेताना खाल्ल्या पलट्या –
गोव्यावरून संभाजीनगर (वाळुज)कडे येणाऱ्या या भरधाव बसने कोल्हापूर जवळील एका वळणावर वळण घेत असताना बस चालकाचा ताबा सुटला आणि बसने दोन पलट्या खाल्ल्या.