वाळूजमहानगर (ता.17) :- खुलताबादला जाण्यासाठी
दुचाकीच्या शोरूमसमोर जीप बोलावून घेतली, मात्र दोन हजार रुपये भाड्यात कट करून घेण्याच्या कारणावरून झालेल्या वादाने डोक्यात लोखंडी रॉड मारून ससानेचा खून केला. त्यानंतर दुचाकीच्या शोरूम मध्ये दिवसभर मृतदेह ठेवला. व विल्हेवाट लावण्यासाठी मयताच्याच क्रुझर जीपमध्ये मृतदेह कोंबून पुरावा नष्ट करण्यासाठी बेवारस सोडली.
वाळुज औद्योगिक परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथील सुधाकर ससाणे हा क्रुझर चालक होता. त्याची तौफिक शेख सोबत ओळख असल्याने दोघात आर्थिक देवाणघेवाण होती. दुचाकीच्या शोरूमवर काम करणाऱ्या तोफिक शेख याला रविवारी सुट्टी असल्याने खुलताबादला जायचे होते. त्यासाठी त्याने ससाणे याची जीप मागितली होती. मात्र त्याच्याकडील बाकी असलेले 2000 रुपये भाड्यापोटी कट करून घेण्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. यावेळी तौफिक शेख याने सुधाकर ससाणे याच्या डोक्यात लोखंडी राँड मारून त्याचा खून केला. रविवारी (ता.13) रोजी सकाळी झालेल्या या खूनाची घटना मंगळवारी (ता.15) रोजी रात्री उघडकीस आली.
गुन्ह्यासंबंधी माहिती मिळताच 2.30 वाजेच्या सुमारास आरोपीचा शोधघेण्यासाठी वाळुज भागात गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अजित दगडखैर, पोउपनि. गजानन सोनटक्के, पोउपनि रमाकांत पटारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल जवखेडे, पोलीस अंमलदार संदीप बिडकर, रविंद्र खरात, सुनिल बेलकर, विजय भानुसे, विलास मुटे, अजय दहिवाल, धनंजय सानप असे रवाना झाले. या पथकाने वाळुज परिसरात आरोपीताचा शोध घेत असतांना 4 वाजेच्या सुमारास गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, आरोपी शेख तौफिक रा. साठेनगर याने हा गुन्हा केला आहे. माहिती मिळाताच शेख तौफिक शेख रफिक वय 22 वर्षे, धंदा- मॅकेनिक, रा. मुळ पत्ता रोहिला पिंपरी, ता. जिंतुर जि. परभणी (ह.मु. इसाब भाई यांचे घरात भाड्याने, साठेनगर, वाळुज, ता. गंगापूर जि. औरंगाबाद) यास सकाळी 8 वाजेच्या सुमारास इसाबभाई रा. साठेनगर यांचे घरातुन ताब्यात घेतले.
दोन हजार रुपयासाठी केला खून –
तौफिक शेख पंढरपूरच्या दुचाकीच्या शोरूममध्ये मेकॅनिक आहे. सुधाकर ससाणे याच्याशी ओळख असल्याने तो तौसिफकडे येत होता. त्याचे 2 हजार रुपये सुधाकरकडे होते. खुलताबादला जाण्यासाठी रविवारी तोफिक याने सशाने याला जीप घेऊन बोलावले होते. ससाणे याच्याकडे असलेले दोन हजार रुपये भाड्यापोटी कट करून घेण्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला होता. तौफिकने सुधाकरच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला. ते निपचित पडला. सुधाकर याला तसेच शोरूमच्या लगत खोलीत टाकून बाहेरून कुलूप लावली.
मृताची जीप घेऊन कुटुंब खुल्ताबादला –
तोफिक याने सुधाकरचा खून केल्यानंतर तौफिक सुधाकरची जीप घेऊन वाळूजला घरी गेला. त्यानंतर कुटुंबीयांसह नातेवाईकाला खुल्ताबाद व म्हैसमाळला दिवसभर फिरून सायंकाळी घरी आला. व रात्री पुन्हा पंढरपुरात शोरूमवर गेला.
पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न –
आरोपी तौफिक याने ससाणे याचा खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी दिवसभर विचार केला. रात्री अंधार पडल्यानंतर ससाणे याच्याच क्रुझर जीपमध्ये मृतदेह टाकून औरंगाबाद पुणे महामार्गवरील गरवारे कंपनी समोर असलेल्या सुनसान जागेवर क्रुझर जीप सोडून फरार झाला.
मोबाईल मुळे झाला उलगडा –
या प्रकरणातील मयत सुधाकर ससाणे व आरोपी तौफिक शेख या दोघांचेही मोबाईल गरवारे कंपनी समोर बेवारस सोडलेल्या क्रुझर जीप जवळ सापडले. याच मोबाईल टावरच्या लोकेशनवरून व कॉल डिटेलवरून मयताची ओळख पटली व आरोपीचाही शोध लावण्यात पोलिसांना यश आले. त्यामुळे घटनेनंतर अवघ्या काही तासातच या प्रकरणाचा उलगडा होऊन आरोपींना गुन्हे शाखेच्या व वाळूज पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी जेरबंद केले.