वाळूजमहानगर – अंदाजे 30 ते 35 वयोगटातील आरोपीने हॉटेलच्या गल्ल्यावर बसलेल्या मॅनेजरला पैशाची मागणी करत शिवीगाळ करून त्याच्यावर सशस्त्र हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात हॉटेल मॅनेजर गंभीर जखमी झाला असून त्यास उपचारात घाटीत दाखल करण्यात आले आहे. या घटनेत आरोपीने 20 ते 25 हजार रुपये बळजबरीने हिसकावून फरार झाला. ही घटना वाळूज औद्योगिक वसाहतीत गुरुवारी (ता.13) रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाळूज औद्योगिक वसाहतीतील जोगेश्वरीजवळ येणाऱ्या एम सेक्टर मध्ये अतुल सतीश चक रा. यूपी (हल्ली मुक्काम बजाजनगर) याचा युपी ढाबा नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलवर बिपिन कुमार हा मॅनेजर म्हणून काम करतो. गुरुवारी (ता.13) रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बिपीन कुमार हा गल्ल्यावर बसलेला असताना आरोपी बाबासाहेब वैद्य वय अंदाजे 30 ते 35 रा. कासोडा हा तेथे आला व बिपिन कुमार याला पैशाची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपीने शिवीगाळ करून बिपिन कुमार याच्या हातावर कुऱ्हाडीने व डोक्यात चाकूने दोन ठिकाणी वार करून गंभीर जखमी केले. तसेच बिपिन कुमार याच्या गळ्यातील सोनसाखळी व गल्ल्यातील वीस ते पंचवीस हजार रुपये बळजबरीने हिसकावून नेले.असे सतीश चक याने सांगितले. या घटनेत बिपिन कुमार हा गंभीर जखमी झाला. त्याला रोहित चक व वीर सिंग यांनी प्रथम बजाजनगर व नंतर घाटीत उपचारार्थ दाखल केले.