
वाळूजमहानगर, (ता.22) – बजाजनगर (वाळूज) येथील सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्र येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रविवारी (ता.21) रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 45 जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. 
श्री अनिरुद्ध आदेश पथक, अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट, अनिरुद्ध समर्पण पथक दिलासा मेडिकल ट्रस्ट आणि रिहाबिलीटेशन सेंटर यांच्या वतीने दरवर्षी 21 एप्रिल रोजी महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून बजाज नगर येथे या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बजाजनगर येथील साई मंदिरात रविवारी (ता.21) रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजे दरम्यान घेण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात परिसरातील 45 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी बजाजनगर येथील अनिरुद्ध उपासना केंद्राचे सप्त संघ सेवक, कार्यकारणी आणि सदस्य यांनी परिश्रम घेतले.
रक्तदान शिबिरास 23 वर्षाची परंपरा –
अनिरुद्ध या सर्व संस्थांच्या अंतर्गत 1999 पासून दरवर्षी महारक्तदान शिबीर आयोजित केले जाते. मागीलवर्षी म्हणजे 2023 साली 25 हजार 535 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या एकाच वर्षी 15 हजार 261 युनिट्स रक्त जमा झाले. या महारक्तदान शिबिरात सहभागी होणाऱ्या सर्वांची संस्थांच्या वतीने आवश्यक ती काळजी घेतली जाते. यंदाचे हे तेविसावे वर्ष आहे. 2020 ते 2022 साली कोविड महामारीमुळे हे शिबीर होऊ शकले नाही. गेल्या चोवीस वर्षात विविध श्रीअनिरुद्ध उपासना केंद्रांवर वर्षभर रक्तदान शिबिर संपन्न झाले. 
गेल्या चोवीस वर्षात महाराष्ट्रात 1 हजार 428 रक्तदान शिबिरे आयोजित केली गेली. यात मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, सांगली, कोल्हापूर, सातारा, या सहित 179 स्थानांचा समावेश आहे. गेल्या चोवीस वर्षात 1 लाख 88 हजार 531 हुन जास्त युनिट्स रक्त जमा केले गेले आहे. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक व गोवा मधील अनेक शासकीय व खाजगी रुग्णालयामधील रक्तपेढ्यांनी या रक्तदान शिबिराचा लाभ घेतला आहे. रक्तदानाविषयी जागरूकता निर्माण केल्यामुळे याची परिणीती दरवर्षी रक्तदात्यांनी संख्या वाढण्यात होत आहे. असे बजाजनगर येथील अनिरुद्ध उपासना केंद्राच्या वतीने महेश शिंगोटे यांनी सांगितले.
