वाळूजमहानगर, ता.14 – तुळजाभवानी माता मंदिराच्या सभा मंडपाचे काम हाती घेण्यात आले आहे. ही मोठी अभिमानाची बाब आहे. सर्व नागरिक व दानशूरांनी एकत्र येऊन सढळ हाताने मदत करावी. जेणेकरून लवकरात लवकर सभा मंडप पूर्ण होईल. आणि येणारा नवरात्र उत्सव तसेच धार्मिक कार्यक्रम याच सभा मंडपात होईल. असा विश्वास राष्ट्रीय भागवत धर्म रक्षक समितीचे अध्यक्ष हभप जनार्दन मेटे महाराज यांनी वाळुज येथे सोमवारी (ता.13) रोजी केले.
वाळूज येथील शिवाजीनगर परिसरात असलेल्या समता कॉलनीत श्री तुळजा भवानी माता मंदिर उभारण्यात आलेले आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम होतात. या कार्यक्रमात ऊन, पावसाचा त्रास होऊ नये. म्हणून सभामंडपाचे बांधकाम हाती घेण्यात आलेले आहे. या कामाचा उद्घाटन सोहळा राष्ट्रीय भागवत धर्म रक्षक समितीचे अध्यक्ष हभप जनार्दन मेटे महाराज यांच्या हस्ते सोमवारी (ता.13) रोजी झाला. यावेळी मेटे महाराज यांनी मार्गदर्शन करून सभा मंडपास लागणाऱ्या आर्थिक बाबीवर प्रकाश टाकत सर्वांना सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्ष्मण पाठे, ज्ञानेश्वर धनवटे, सोपान महाराज, आवटे महाराज, दादाराव महाराज बनसोडे, सरगर महाराज, माजी सरपंच पपीन माने, ग्रामपंचायत सदस्य राहुल भालेराव, माजी ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार राऊत, सुश्रुत जनरल हॉस्पिटल व सुश्रुत आयुर्वेद चिकित्सालयाचे डॉ. आशिष जाधव, लघाने मल्टीस्पेशालिटीचे डॉ.अक्षय लगाने, बंडू पाठे, दळे पाटील, उत्तम बनकर, रामदास शिंदे, चेतन बोरुले, रमेश शेळके, विजय निपुंगे, डॉ. कैलास राठोड, श्रीराम बोचरे, सुरेश केरे, संजय बोरुडे, तात्यासाहेब देवडे, गोकुळ बोबडे, संजय काजळे, रुपेश नाडे आदींसह पुरुष व महिला भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री तुळजाभवानी मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
या सभा मंडपासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्ष्मण पाठे यांच्या पुढाकाराने मराठवाडा पदवीधर संघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी 2 लाख रुपये रोख दिले. तसेच परिसरातील नागरिकांनीही मोठा सहभाग नोंदवत सढळ हाताने मदत केली. त्यामुळे या सभामंडपाचे काम लवकरच पूर्ण होणार असल्याचेही ते म्हणाले.