वाळूज महानगर, (ता 27) – नागरिकांनी त्यांच्या घरासमोर अवैधरित्या अतिक्रमण करून दुकान गाळे बांधल्याने रस्ता अरुंद झाला. त्यामुळे सिडकोच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. दरम्यान हे अतिक्रमण हटवताना तफावत केल्याचा आरोप करत एका संतप्त व्यावसायिकाने स्वतःच्या दुकानातील साहित्य स्वतः जाळून अधिकाऱ्या विरोधात रोष व्यक्त केला. हा प्रकार गुरुवारी (ता.27) रोजी दुपारी सिडको वाळूज महानगर येथे घडला.
रस्त्यावरील घरासमोर अतिक्रमण वाढल्याने सिडको वाळूजमहानगरात अवैध बांधकामावर सिडको प्रशासनाने कार्यवाहीचा बडगा उगारत अवैध बांधकाम काढण्यास सुरुवात केली. सिडको वाळूज महानगरात अनेक
रहिवाशी नागरिकांनी घराच्या समोरच व्यावसायिक दुकाने सुरू करून अतिक्रमण केले होते. काहींनी गाळे बांधून विकले. रस्त्याच्या कडेला दुकाने येत असल्याने रहदारीला अडचण निर्माण होत होती. त्यामुळे अपघाताच्या घटनाही वाढत असल्याने अखेर सिडको प्रशासनाने अवैध बांधकाम निष्काशीत करण्यासाठी अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली.
सिडको वाळूज महानगर 1 मधील जय मल्हार चौकामध्ये गुरुवारी (ता.27) रोजी सिडकोची ही कारवाई सुरु होती. या कारवाईला व्यापाऱ्यांनी विरोध केला. आधी पक्के बांधकाम काढा, नंतर आमच्यावर कारवाई करा. असे नागरिकांचे म्हणणे होते. दरम्यान अधिकारी ऐकत नसल्याने तरुणाने अधिकाऱ्यांना व्याकुळ होऊन विनवण्या केल्या. नंतर आक्रमक होत स्वतःच्या दुकानातील साहित्य स्वतः जाळून अधिकाऱ्याविरोधात रोष व्यक्त केला. त्यामुळे नागरिकांनी ही आक्रमक पवित्रा घेत अतिक्रमण काढणाऱ्या अधिकाऱ्यांना जोरदार विरोध केला. विशेष म्हणजे एवढा गोंधळ होत असतांना तेथे एकही पोलीस अधिकारी, कर्मचारी नवते. घटना घडल्याचे समजताच पोलिसांनी धाव घेतली.
शेती विकूण घेतले होते दुकान –
माणिक ज्ञानोबा शिंदे, सिडको वाळूज महानगर छत्रपती संभाजीनगर असे दुकानातील सामान जाळून रोष व्यक्त करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याने वडिलोपार्जित शेती विकून येथे दुकान गाळा खरेदी केला होता. मात्र दुकान गाळा अतिक्रमणात गेल्याने तो हतबल झाला. “बाबा गेला आणि दशम्याही गेल्या” अशी गत या तरुणाची झाल्याने तो व्याकुळ झाला होता.
कारवाईला नाही, मनमानीला विरोध –
अतिक्रमण हटवण्याबाबत होत असलेल्या सिडकोच्या कारवाईला विरोध नाही, कारवाईची पद्धत मात्र चुकीची आहे. अधिकाऱ्यांच्या मनमानीला आमचा विरोध
आहे. अशी प्रतिक्रिया यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपशहरप्रमुख छ्त्रपती संभाजीनगर (पश्चिम) दत्तात्रेय वर्पे यांनी दिली.
