
वाळूजमहानगर, (ता.6) – नशेत तर्रर्र होऊन एका अर्धनग्न बिहारी तरुणाने पंढरपूर येथील विठ्ठल रुख्मिणी मंदिराच्या कळसावर चढून आरडाओरड करत पितळी कळस जोरजोरात हलवून तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र मंदिर समितीने तात्काळ पोलिसांना पाचारण केल्याने पुढील अनर्थ टळला. अंगावर शहारे आणणारा हा थरारक प्रकार गुरुवारी (ता.6) रोजी भल्यापहाटे अडीच वाजेच्या सुमारास पंढरपूर येथे घडला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाळूज पंढरपूर येथील विठ्ठल रुख्मिणी मंदिरात बुधवारी रात्री सर्व धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर मंदिर बंद करून विश्वस्त मंडळ घरी गेले होते. त्यानंतर गुरुवारी (ता.6) रोजी भल्यापहाटे अडीच वाजेच्या सुमारास नशेत तर्रर्र असलेल्या एका बिहारी तरुणाने अंगातील शर्ट काढून श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर संस्थान पंढरपूरचे कंपाऊंड कुदुन आत प्रवेश केला. यावेळी संस्थानच्या वॉचमनने त्यास हटकविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने दगड मारण्यास सुरुवात करुन मंदिर गाभारावर गेला. त्यानंतर तो थेट कळसावर साखळीच्या सहाय्याने चढला. व मोठमोठ्याने आरडाओरड करत कळस जोरजोराने हलवून तोडण्याचा प्रयत्न करू लागला. हा प्रकार मंदिराच्या वाचमनने लगेचच संस्थानच्या पदाधिकाऱ्यांना फोन करून सांगितला. या घटनेची माहीती वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक रामेश्वर गाढे यांना कळविण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेताच वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री शिंदे, भगतसिंग घुनावत व सहकारी पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेत योग्य दक्षता घेवुन कळसावर चढलेल्या तरुणास सुखरुप खाली उतरवून ताब्यात घेतले.
पोलीसांच्या सतर्कतेमुळे खुप मोठा अनर्थ टळला.
यावेळी संस्थानचे अध्यक्ष राजेंद्र पाटील पवार, सचिव आप्पासाहेब पाटील झळके, ग्रामपंचायत सदस्य शेख जावेद, शेख चांद, रोहत राऊळ, विष्णु राऊत, जगन्नाथ औताडे, दिपक कानडे, सागर कानडे, लखन सलामपुरे, राजु म्हस्के व गावकऱ्यांचे सहकार्य झाले.
दरम्यान या घटनेत किरकोळ जखमी झालेल्या त्या बिहारी तरुणाला वाळुज एमायडिसी पोलिसांनी प्रचारार्थ घाटीत दाखल केले. मात्र वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मंदिराच्या कळसावर चढलेल्या त्या माथेफिरूचे नाव, गाव समजू शकले नाही.
कारण अद्याप गुलदस्त्यात
पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या कळसावर चढलेला हा बिहारी तरुण सहकार्यासह पंढरपूर येथे राहतो. तो नशेत होता. त्याच्या रूम पार्टनर न जुमानता तो पळत होता. नशेतच तो मंदिराच्या कळसावर चढला. मात्र तो कळसावर कशासाठी चढला. त्याला आत्महत्या करायची होती की, कळस चोरून न्यायचा होता. हे अद्यापही कुलदस्त्यातच आहे.
मंदिराचा कळस सुरक्षित
पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर लावण्यात आलेला लाखो रुपये किमतीचा कळस चितळाचा असून तो पाच फूट उंचीचा आहे. तो लोखंडी रोड मध्ये अत्यंत मजबूत पुरवलेला आहे. त्यामुळे हा कळस त्या फिरूकडून निघू शकला नाही. मंदिराचा कळस सुरक्षित आहे. असे श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर संस्थान पंढरपूरचे अध्यक्ष राजेंद्र पवार पाटील यांनी सांगितले.
