March 23, 2026

वाळुज महानगर, (ता.3) – छत्रपती संभाजीनगर येथील भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्था संचालित श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसी, बजाजनगर या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या नामवंत शैक्षणिक संस्थेला महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांच्याकडून शैक्षणिक वर्ष 2024 -25 साठी ‘उत्कृष्ट’ (Excellent) श्रेणी प्रदान करण्यात आली. ही महत्त्वपूर्ण माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष शेळके यांनी दिली.

ही श्रेणी केवळ संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीचीच नाही, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार, नवोपक्रमशील आणि उद्योजकतेला चालना देणारे शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल मानली जात आहे.
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या शैक्षणिक देखरेख समितीच्या विशेष पथकाने नुकतीच महाविद्यालयाची प्रत्यक्ष भेट घेऊन विविध शैक्षणिक आणि प्रशासकीय निकषांवर आधारित सखोल मूल्यांकन केले. या तपासणीमध्ये प्राध्यापकांची गुणवत्ता, अध्यापन पद्धती, अभ्यासक्रमांची अंमलबजावणी, प्रयोगशाळांची सुविधा, ग्रंथालयातील ग्रंथसंपदा, संगणक कक्षातील अद्ययावत तंत्रज्ञान, विद्यार्थ्यांचे निकाल, संशोधन व प्रकल्प कार्य, विद्यार्थ्यांसाठी घेतले जाणारे उपक्रम, तसेच मुलींसाठी सुरक्षित वस्तीगृह यांसारख्या अनेक घटकांचा समावेश होता. याच अनुषंगाने, संस्थेचे सातत्य, शिस्तबद्ध व्यवस्था, आणि प्रत्येक विभागात दिसणारे दर्जेदार कार्य हे ‘उत्कृष्ट’ श्रेणीच्या स्वरूपात प्रत्यक्षात आले आहे.
विशेष बाब म्हणजे, 2018 -19 या शैक्षणिक वर्षात स्थापन झालेल्या श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसीस गेल्या सात वर्षांमध्ये चौथ्यांदा ‘उत्कृष्ट’ श्रेणीचा सन्मान प्राप्त झाला आहे. ही बाब संस्थेच्या सातत्यपूर्ण गुणवत्तेची, नवे तंत्र स्वीकारण्याची आणि शैक्षणिक क्षेत्रातील नेतृत्वभावनेची साक्ष ठरते.
प्राचार्य डॉ. संतोष शेळके यांनी या यशाचे श्रेय संपूर्ण महाविद्यालयीन परिवाराला देत सांगितले की “शिक्षकवर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यमान आणि माजी विद्यार्थी, पालकवर्ग, तसेच संस्थेचे मार्गदर्शक मंडळ या सर्वांच्या समन्वयातूनच हे यश शक्य झाले आहे. आम्ही विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान नव्हे तर व्यावसायिक कौशल्य, नैतिक मूल्ये आणि सामाजिक जाणिवा या सर्व बाबींमध्ये सक्षम बनवण्याचा प्रयत्न करत आहोत.”
या गौरवाबद्दल भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेचे सचिव एकनाथ जाधव, सहसचिव अमन जाधव, आणि प्रशासकीय अधिकारी भागचंद जाधव यांनी संपूर्ण महाविद्यालयीन कुटुंबाचे अभिनंदन करत, संस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की, “संस्थेचा उद्देश केवळ पदवी प्रदान करणे नाही, तर समाजासाठी जबाबदार, प्रशिक्षित आणि मूल्याधिष्ठित औषधनिर्माण तज्ज्ञ घडवणे हा आमचा खरा हेतू आहे.”
श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसी हे केवळ अभ्यासक्रमात निपुणता मिळवून देणारे महाविद्यालय नसून, येथे उद्योग सहकार्य, नवनवीन शैक्षणिक प्रयोग, संशोधन प्रकल्प, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सेमिनार्स, व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा, प्लेसमेंट ट्रेनिंग, आणि करिअर गाईडन्स यांसारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना व्यावसायिकतेसाठी पूर्णतः सज्ज केलं जातं.
महाविद्यालयात कार्यरत तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग, अपडेट अभ्यासक्रम, स्मार्ट क्लासरूम्स आणि डिजिटल लर्निंग टूल्स यामुळे शिक्षण अधिक प्रभावी आणि संवादात्मक बनवण्यात यश आले आहे. श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसीने मिळवलेले हे यश म्हणजे केवळ एक शैक्षणिक विजय नाही, तर ग्रामीण भागातही जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध होऊ शकते याचे प्रत्यक्ष उदाहरण ठरले आहे. मराठवाडा आणि आसपासच्या भागातील शेकडो विद्यार्थ्यांनी या संस्थेमुळे आपल्या करिअरला योग्य दिशा आणि संधी प्राप्त केली आहे.
   या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयाची जबाबदारी अधिक वाढली आहे. भविष्यात औषधनिर्माण क्षेत्रात नाविन्यपूर्ण संशोधन, उद्योग क्षेत्राशी भागीदारी, उद्योजकता विकास, आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक देवाण-घेवाण कार्यक्रम सुरू करण्याचे उद्दिष्ट प्रस्थापित करण्यात आले आहे. श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसीने मिळवलेला ‘उत्कृष्ट’ श्रेणीचा बहुमान हा संस्थेच्या गुणवत्तेचा आणि सामाजिक बांधिलकीचा एक सुवर्ण अध्याय आहे. अशी प्रतिक्रिया विद्यार्थी आणि पालकांमधून दिल्या जात आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *