
वाळूजमहानगर (ता.19) – महिलांच्या बाजूने असलेल्या कायद्याचा तसेच महिलांची बाजू घेऊन पुरुषांवर अन्याय लादणाऱ्या न्यायाधीशाचा निषेध करत वाळूज परिसरातील करोडी येथील पत्नी पीडित पुरुष आश्रम, छत्रपती संभाजीनगर येथे शीर्षासन करून रविवारी (ता.19) नोव्हेंबर रोजी पुरुष दिन साजरा करण्यात आला.
जागतिक महिला दिना प्रमाणेच जागतिक पुरुष हक्क दिन 19 नोव्हेंबर हा जवळपास 30 देशांमध्ये साजरा केल्या जातो. महिला प्रमाणेच पुरुषांना देखील आपल्या अधिकारा विषयी जाणीव तथा ज्ञान होऊन जागरूकता व्हावी. पुरुषांना देखील समाजात मानाचे स्थान मिळावे तसेच दिवसेंदिवस पत्नीकडून पतीचा छळ वाढत चालला आहे.
महिला सबलीकरण करण्याच्या नावाखाली महिलांना पाहिजे त्यापेक्षा जास्त कायदे निर्माण झाल्यामुळे अनेक महिला कायद्याचा दुरुपयोग करून पतीला शारीरिक, आर्थिक, मानसिक त्रास देत आहेत. त्यामुळे आजघडीला पती म्हणजेच पुरुष हा हतबल झाला आहे. सर्व कायदे हे महिलेच्या बाजूने असल्याने पुरुषांना त्याचा विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे.
आजच्या परिस्थितीत महिलांचे प्रशासन, न्यायालय ऐकत असल्यामुळे पुरुषांना त्यांच्या हक्काबद्दल बोलण्यासाठी कोणीही समोर येताना दिसत नाही. अशा परिस्थितीत पत्नी पीडित पुरुषांनी कुठे जावे हा प्रश्न आज पत्नी पीडित पुरुषासमोर उभा आहे. पुरुषांवर अन्याय झाल्यास, समाज ऐकत नाही, पोलीस ऐकत नाही व न्याय व्यवस्था देखील ऐकत नाही. त्यामुळे पुरुष हतबल तर झालाच परंतु पुरुषांचे दरडोई उत्पन्न देखील घटत जाऊन विवाह संस्था धोक्यात आली आहे.
म्हणून एकतर्फी कायदे रद्द व्हावे तसेच पुरुषांसाठी स्वतंत्र पुरुष आयोग स्थापन करावा. व इतर मागण्या तसेच पुरुषांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याकरिता कौटुंबिक समस्याग्रस्त पुरुष आश्रम, छत्रपती संभाजीनगर येथे 19 नोव्हेंबर रोजी शीर्षासन करून जागतिक पुरुष हक्क दिन साजरा करण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष ॲड.भारत फुलारे, वैभव घोळवे, चरणसिंग गुसिंगे, संजय भांड, प्रवीण कांबळे, विशाल नांदेडकर, विजय नाटकर, सोमनाथ मनाळ आदींची उपस्थिती होती.
