वाळुज महानगर, (ता.23) – छत्रपती ते नाशिक जाणारी शिवशाही बसच्या चारही चाकांचे व्हील गुरुवारी (ता.23) रोजी जाम झाल्याने बस दोन तासापासून रस्त्यामध्येच थांबली आहे. त्यामुळे गरवारे कंपनी समोर वाळूज महामार्गावर वाहतूक कोंडी झाली.
याबाबत प्रवाशांकडून मिळालेली माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर निफाड मार्गे नाशिकला जाणारी शिवशाही बस (एम एच 06, बी डब्ल्यू – 4397) ही वाळूज जवळील गरवारे कंपनी समोर येताच सर्व चाकांचे व्हील जाम झाले. चालकाने बराच वेळ प्रयत्न केले. मात्र बस जागची हल्ली नाही. प्रवाशांनी खचाखच भरलेली ही बस जवळजवळ दोन तासापासून रस्त्यामध्येच उभी आहे. परिणामी वाळूज ते पंढरपूर दरम्यान वाहतुकीची कोंडी होऊन लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
या वाहतूक कोंडीतून सुटका मिळवण्यासाठी अनेक वाहनधारक विरुद्ध बाजूने म्हणजेच रॉंग साईडने वाहन चालवताना दिसून आली. शेवटी दोन तासाच्या वेळेनंतर वाहतूक शाखेचा एक कर्मचारी घटनास्थळी आला. मात्र मेकॅनिक आल्याशिवाय बस जागची हलणार नसल्याचे सांगताच पोलीस कर्मचारी सुद्धा हतबल झाले.