
वाळुजमहानगर, (ता.26) – बजाजनगर येथील शिवछत्रपती विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा ‘ गजर – कला आणि संस्कृतीचा ‘ अत्यंत उत्साह आणि दिमाखात संत एकनाथ रंगमंदिर, छत्रपती संभाजीनगर येथे नुकताच झाला. यात विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
या संमेलनाचे उद्घाटन दसरथ मुळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवगिरी नागरी सहकारी बँकेचे चेअरमन किशोर शितोळे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून इंटरनॅशनल कोच आणि जिम्नॅस्टिक जेज प्रा. प्रविण शिंदे तसेच शिवछत्रपती विद्यालयाच्या अध्यक्षा तथा मुख्याध्यापिका विद्या भोसले, उपाध्यक्ष जाधव, भोसले, सचिन चव्हाण, संदिप जाधव यांची उपस्थिती होती.
प्रथम शिवछत्रपती विद्यालयाच्या अध्यक्षा तथा मुख्याध्यापिका विद्या भोसले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व शाळेचा वार्षिक प्रगतीचा अहवाल सादर केला. या स्नेहसंमेलनाची सुरुवातशाळेतील विद्यार्थ्यांच्या बहारदार ‘स्वागत गीताने झाली. यावेळी बालवर्ग ते इयत्ता 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी देवलोक संस्कृती, आजी-आजोबा मूल्य, देशप्रेम, बंधुत्व, बलिदान, अंधश्रद्धा अशा वेगवेगळ्या संकल्पनावर आधारित नृत्य, नाट्य, गीत या माध्यमाद्वारे प्रभावीपणे सादरीकरण केले. प्रत्येक सादरीकरणातून विद्यार्थ्यांची कला, शिस्त, एकात्मता, बंधुभाव आणि संस्कार यांचा सुंदर संगम दिसून आला. प्रत्येक क्षणी विद्यार्थ्यांची मेहनत झळकत होती. एवढेच नव्हे तर प्रत्येक कृती समाजाला सकारात्मक संदेश देणारी ठरली.
उद्घाटक दशरथ मुळे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांचे व शाळेचे कौतुक करत, परिस्थिती बिकट असतांनी सुद्धा विद्यार्थी आपल्या मेहनतीच्या बळावर मोठे यश संपादित करू शकतो. अध्यक्षीय भाषणात किशोर शितोळे यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता स्नेहसंमेलनासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो. हा संदेश विद्यार्थ्यांना दिला. प्रमुख पाहुणे प्रा. प्रवीण शिंदे यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य व क्रीडाविषयक सल्ला व मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात विद्यालयातील गुणवंत विद्यार्थी, विविध स्पर्धेमधील विजेते व आदर्श विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प व ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांसोबत आलेल्या पालकांकरिता प्रश्नमंजुषा ‘कार्यक्रम व ‘लकी -ड्रॉ ‘ ठेवण्यात आला होता. विजेत्या पालकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नागेश कदम, अमोल चव्हाण, सारिका डोंगरे, अर्चना भगत, रेवती तायडे, सुरेखा राजमाने, स्वाती शिरसाठ, संध्या ढवळे, शांती तूपशेंद्रे, अरुणा खडसे, अश्विनी करंजे या शिक्षकांचे सहकार्य लाभले.
