
वाळुज महानगर – वाळूज परिसरातील करोडी शिवारात असलेल्या पत्नी पीडित पुरुष आश्रमात शिर्षासन करत (उलटे होऊन) बुधवारी 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता अत्यंत अनोख्या पद्धतीने जागतिक पुरुष दिन साजरा करण्यात आला. यातून पुरुष सबलीकरणाचा मुद्दा अग्रस्थानी आणून लिंगभेद न करता समान न्याय देणारे कायदे करण्याची मागणी करण्यात आली.
करोडी येथील पत्नीपीडित आश्रमात एडवोकेट भारत फुलारे यांच्या मार्गदर्शनाखालीच्या शासन आणि समाज पुरुषांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे प्रतीक म्हणून आश्रमातील सदस्यांनी शीर्षासन करून अनोखा आंदोलनात्मक कार्यक्रम राबविला. 8 मार्चचा जागतिक महिला दिन संपूर्ण देशातील सर्व कार्यालयांमध्ये उत्साहाने साजरा केला जातो; परंतु जागतिक पुरुष दिन (19 नोव्हेंबर) हा दिवस अगदी शासनालाही विस्मरणात नसल्याचे चित्र वर्षानुवर्षे दिसत आहे. भारतीय संविधानातील कलम 14 व कलम 21 नुसार स्त्री-पुरुष समान असूनही आज कायदे, नियम आणि सरकारी धोरणे केवळ महिलांच्या बाजूने झुकलेली असल्यामुळे पुरुषांवर अन्याय होण्याची प्रवृत्ती वाढलेली आहे. स्त्रियांच्या सबलीकरणासाठी अनेक कायदे करण्यात आले. ते आवश्यकही होते. मात्र त्यावेळी पुरुष ‘अ’बला’ होणार नाहीत याची दक्षता घेतली गेली नाही. त्यामुळेच आज स्थिती उलटली असून महिला सबला झाल्या आहेत. परंतु पुरुष मात्र दुर्बल झाले आहेत
एकतर्फी कायद्यांचा वापर करून काही महिलांकडून होणाऱ्या गैरवापरामुळे पुरुष वर्ग मानसिक, सामाजिक आणि आर्थिक अडचणीत सापडत आहे. महिलांकडून होणाऱ्या अत्याचारामुळे अनेक पुरुष हताश होऊन आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहेत, ज्याची नोंद एन सी आर बी (NCRB) अहवालात सातत्याने दिसून येते, विवाहसंस्था डळमळीत होत असून लग्न हा गुन्हा केल्यासारखा अनुभव अनेक पुरुषांना येत आहे. पवित्र विवाहबंधनाचे व्यवसायात रूपांतर होत असल्याचे समाजात दिसते. एकत्र कुटुंब व्यवस्था मोडीत निघत असून युवा पिढी विवाहापासून दूर जात आहे. पुरुषांवर अन्याय, अत्याचार, खोट्या तक्रारी, आर्थिक शोषण अशा अनेक समस्या निर्माण होत आहेत; पण त्याची दखल न समाज घेतो, न पोलिस, न न्यायव्यवस्था. पुरुषांच्या वेदना व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ नाही, तक्रार केली तरीही तिला गांभीर्याने घेतले जात नाही. म्हणून या निषेधार्थ बुधवारी 19 नोव्हेंबर रोजी पत्नी पीडित पुरुष आश्रमातील सदस्यांनी शासन आमच्या वेदन ऐकत नाही. म्हणून आम्ही स्वतःच ‘उलटे’ झालो, असे सांगत शीर्षासन करून पुरुष दिन साजरा केला.
या कार्यक्रमास पत्नी पीडित पुरुष आश्रमाचे अध्यक्ष एड. भारत फुलारे, चरणसिंग गुसिंगे, भाऊसाहेब साळुंके, वैभव घोळवे, सोमनाथ मनाळ, संजय भांड, उमेश दुधाट पाटील यांच्यासह इतर अनेक पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
