
वाळूजमहानगर, (ता.02) – शिक्षक, विद्यार्थी आणि पालक हे शाळा चालवण्याचे प्रमुख आधारस्तंभ आहेत, त्यांनी एकत्रितपणे शाळेच्या विकासासाठी योगदान देणे अत्यंत आवश्यक आहे. पालकांनी मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले नाही, तर शाळेच्या अस्तित्वाला अर्थ उरणार नाही. त्यामुळे पालकांनीही आपल्या पाल्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे असे प्रतिपादन उद्योजक हनुमान भोंडवे यांनी बजाजनगर येथील स्व. भैरोमल तनवाणी विद्या मंदिर या शाळेत पालकांना मार्गदर्शन करताना केले.
बजाजनगर येथील स्व. भैरोमल तनवाणी शाळेत पालक मेळाव्याचे आयोजन शनिवारी (ता.31) रोजी करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक हनुमान भोंडवे पालकांना मार्गदर्शन करीत होते. प्रथम सरस्वती मातेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा शिंदे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मुख्याध्यापिका सुरेखा शिंदे यांनी प्रास्ताविकात शाळेच्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी प्रमुख पाहुणे उद्योगपती हनुमान भोंडवे म्हणाले की, शिक्षकांनी आपले काम नीट केले नाही तर मुलांचे शिक्षण ठप्प होईल. तसेच शिक्षकांच्या सूचनेनुसार विद्यार्थ्याने घरी व शाळेत नियमित अभ्यास केला नाही. तर शाळेचा निकाल चांगला लागणार नाही. शिक्षक, विद्यार्थी व पालकांमधील संबंध दृढ करण्याचे आवाहन केले. शिक्षक, विद्यार्थी आणि पालक हे शाळा चालवण्याचे प्रमुख आधारस्तंभ आहेत, त्यांनी एकत्रितपणे शाळेच्या विकासासाठी योगदान देणे अत्यंत आवश्यक आहे. पालकांनी चांगल्या शिक्षणाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवा. कार्यक्रमाच्या माध्यमातून पालकांनी दिलेल्या महत्त्वाच्या सूचनांच्या आधारे शाळांची स्थिती सुधारण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील. असेही ते म्हणाले.
यावेळी गजानन उजाड, प्राचार्या सुरेखा शिंदे, पर्यवेक्षक अशोक मुटकुळे, केशव कानिटकर, प्रदीप माळी, शारदा पगारे, शेख के. एन.,शोभना गव्हाड आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघा इटनकर यांनी केले तर दिगंबर आंबेकर यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
