
वाळूज महानगर – मुख्यमंत्र्याचा दौरा असताना सुद्धा जलसमाधी आंदोलनाचा इशारा देत पोलिसांना वेठीस धरण्यासाठी शासकीय यंत्रणेचा व मनुष्यबळाचा अपव्यय केल्याचा पोलिसांनी ठपका ठेवत उग्र स्वरूपाच्या आंदोलनावर ठाम असलेल्या कार्यकर्त्याविरुद्ध वाळुज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गणेश मनोहर राऊत रा. दहेगाव (बंगला) यांच्या लेटर हेडवर तहसीलदार गंगापूर यांना निवेदन दिले होते त्यात नमुद होते की, वाळूज पोलीस ठाणे हद्दीत दसऱ्याचे दिवशी 2 ऑक्टोबर 2025 रोजी लिंबेजळगाव येथील मुरूम उत्खननातील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात ट्रॅक्टर धुण्यासाठी गेलेल्या 4 मुलांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेला महसूल प्रशासनास जबाबदार धरून संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. यासह इतर मागण्या संदर्भात शुक्रवारी 10 ऑक्टोबर रोजी लिंबेजळगाव येथे जलसमाधी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाची दिशा व रूपरेषा समजून घेण्यासाठी त्यावर सह्या असणाऱ्यांना फोन करून विचारणा केली असता त्यांनी केवळ आंदोलन करण्यात येणार आहे एवढेच कळविले. आंदोलकांनी उग्र स्वरूपाचे आंदोलन जाहीर केलेले असल्याने या आंदोलनास पोलिसांनी परवानगी नाकारत आंदोलन करत्यांना बीएनएसएस कलम 168 अन्वये नोटीस तामिल करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी जाणीवपूर्वक नोटीस घेण्याचे टाळले. ते आंदोलनावर ठाम राहील्याने बंदोबस्तासाठी अतिरीक्त मनुष्यबळ मागवुन घेतला. मुख्यमंत्र्यांचा शुक्रवारी 10 ऑक्टोबर रोजी दौरा असल्याने पोलीसांवर बंदोबस्ताचा मोठा ताण असताना कार्यकर्त्यांच्या खोडसाळ वर्तनामुळे पोलीस दलाचे मनुष्यबळाचा अपव्यय झाला. त्यामुळे निवेदनावर सह्या करणारे गणेश राऊत, भाऊसाहेब शेळके, राहुल ढोले, देविदास पाठे, पप्पु उर्फ विनय खरात, नानासाहेब पाचपुते यांनी जाणीवपूर्वक आंदोलन करून कायदा व सुव्यवस्स्थेचा प्रश्न निर्माण करण्याची भीती घालून पोलिसांना अत्यंत व्यस्त काळात वेठीस धरून मनुष्यबळाचा अपव्यय केला. असे पोलिसांनी सांगितले.
या निवेदनावरील इतरांनी या आंदोलनाशी काही संबंध नाही व त्यांची नावे खोडसाळपणे टाकुन त्यांच्या बनावट सह्या केल्याचे त्यांनी सांगितले. यापैकी गणेश मनोहर राऊत व राहुल उत्तमराव ढोले हे गुन्हेगार असून गणेश राऊत हा पूर्वी हद्दपार होता. व राहुल ढोले याच्या विरुद्ध खंडणीचा गुन्हा आहे. त्यामुळे पोलिसांवर राग काढण्याच्या उद्देशाने त्यांनी उग्र आंदोलनाचा इशारा देऊन बंदोबस्त नेमण्यास भाग पाडले. या प्रकरणी पोलीस हवालदार दत्तात्रय मुरलीधर गढेकर यांच्या फिर्यादवरून वाळुज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
