
वाळूजमहानगर, (ता.14) – शहीद भगतसिंह विद्यालय, बजाजनगर येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक गौतम शिंदे, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक नितीन देशमुख, चक्रधर डाके, वैभव ढेपे हे मान्यवर उपस्थित होते.
प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक गौतम शिंदे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नुसते पुस्तकी पंडित नव्हते तर त्यांनी आपल्या आयुष्यात आचार आणि विचार यांची सांगड घातली आणि आपल्या तत्वज्ञानाला कृतीची जोड दिली. रंजल्या गांजल्या जनतेच्या उद्धारार्थ प्राण पणाला लावून समतेची मंगलवाट दाखविली.
तसेच प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक नितिन देशमुख यांनी सांगितले की, शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. समाजातील अस्पृश्य समाजाला स्वत्वाची जाणीव व्हावी यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्व समाजात विशद केले. तसेच प्रमुख पाहुणे चक्रधर डाके, वैभव ढेपे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना उजाळा दिला. या कार्यक्रमासाठी माध्यमिक विभाग, प्राथमिक विभाग तसेच इंग्रजी विभागातील शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचारी उपस्थित होते. शिक्षक प्रतिनिधी रामा चोपडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले.
