वाळूजमहानगर – बजाजनगर येथील शहीद भगतसिंह विद्यालयांमध्ये मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव दामोदर मानकापे उपस्थित होते. तसेच माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक गौतम शिंदे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक नितीन देशमुख, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका अनामिका गोरे हे उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या हस्ते ध्वजारोहण व शाळेच्या प्रांगणातील शहीद भगतसिंह यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच थोर क्रांतिकारक शहीद भगतसिंह व मराठवाडा मुक्ती संग्रामचे थोर नेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी दामोदर मानकापे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला, त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता. त्यावेळच्या 565 पैकी 562 संस्थांनांनी स्वतंत्र भारतात सामील होण्याची सहमती दिली. मात्र हैदराबाद, काश्मीर आणि जुनागढ ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती. हैदराबाद संस्थानावर निजामाचे राज्य होते. निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता. निजाम शरण येत नाही आणि नागरिकांवर अत्याचार वाढले हे पाहून 13 सप्टेंबर 1948 रोजी पोलीस ऍक्शन सुरु झाले. मुख्य फौजा सोलापूरकडून घुसल्या. पहाटे 4 वाजता ऑपरेशन सुरु झाल्यावर 2 तासात नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर, परभणी ते विजयवाड्याकडील भाग भारतीय फौजांनी ताब्यात घेतले. दुसरीकडे अनेक ठिकाणी विमानतळावर भारतीय फौजांनी हल्ले केले. 15 सप्टेंबर रोजी औरंगाबाद सर करुन फौजा पुढे निघाल्या. तेंव्हा निजामी सैन्य माघार घ्यायला लागले होते. हैदराबादचे सेनाप्रमुखांनी 17 सप्टेंबर 1948 रोजी शरणांगती स्वीकारली आणि खुद्द निजाम शरण आला. हैदराबाद मुक्ती संग्राम यशस्वी झाला. हैदराबाद संस्थानात तिरंगा फडकला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वर्षा जाधव, महादेव लाखे, रामा चोपडे, वैभव ढेपे, रोहिणी पवार, चक्रधर डाके, शितल घोडके, राजेंद्र मघाडे, भरत बोडके, शहाजी भूकन, जितेंद्र बरंजाळेकर, सुनंदा गायकवाड, सोनल पाटील, अतिश डोईफोडे, गीतांजली डोके, सुनिता साकृडकर, अंबिका साळवे, आशिष मात्रे, ज्योती बाणेदार, सुवर्णा अहिरे, गोपाळ अधाने, वर्षा बनकर, अश्विनी सुरडकर, वर्षा पाटील, रूपाली नवले, वैशाली पाटील, राजश्री घुले, अर्चना समरीत, रचना पाटील, श्रेया पाठक, अर्चना शेंडे, प्रिया यादव, प्रकाश वाघ, विनोद मस्के, राहुल साबळे, शैलेंद्र रसाळ, भाऊसाहेब कोळी आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक प्रतिनिधी राजेंद्र मघाडे तर आभार रामा चोपडे यांनी मानले.