वाळूजमहानगर, ता.28 – शेतात गवत काढत असलेल्या 80 वर्षीय वृद्ध महिलेच्या पाठीमागून लपत छपत येऊन गळ्यातील 7 हजार रुपये किमतीचे डोरले हिस्कावणाऱ्या चोरट्यास पकडून बेदम चोप देत पोलीसांच्या स्वाधीन केले. ही घटना रविवारी (ता.27) दुपारी आंबेलोहळ शिवारात घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आंबेलोहळ येथील हौसाबाई हरिभाऊ सोनवणे वय 80 वर्ष ही वृद्ध महिला रविवारी (ता.27) रोजी शेतात गवत काढत होती. दुपारी 1 वाजेच्या सुमारास लपत-छपत आलेल्या एका तरुणाने हौसाबाई यांच्या गळ्यातील अंदाजे 2 ग्रॅम वजनाचे व 7 हजार रुपये किमतीचे सोन्याचे डोरले हिसकावले. या घटनेमुळे घाबरलेल्या हौसाबाई यांनी मदतीसाठी आरडाओरड केली असता त्यांच्या नातेवाईकांनी पाठलाग करून चोरट्याला पकडले. तो गावातील अर्जुन रतन जाधव (21) असल्याचे स्पष्ट होताच त्यास चांगलाच चोप देऊन पकडून ठेवले. ही माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीस ताब्यात घेतले. या प्रकरणी नवनाथ हरिभाऊ सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.