February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.14) – वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली वीज गळती रोखण्यासाठी व वीज चोरांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू असताना नागरिकांनी तीव्र विरोध केला. त्यामुळे गावातील वातावरण तंग झाले. दरम्यान पोलिसांनी तात्काळ धाव घेतल्याने पुढील अनर्थ टाळला. ही घटना शनिवारी (ता.14) रोजी वाळूज येथे घडली.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या वाळूज येथील 33 व 11 केव्ही उपकेंद्र अंतर्गत हनुमंतगाव व लोकशाहीर आण्णाभाऊ साठेनगर येथे जिल्ह्यातील सर्वात जास्त वीज गळती असल्याचे महावितरण कंपनी अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे या परिसरातील वीज गळती रोखण्यासाठी अधीक्षक अभियंता दुरोळी व कार्यकारी अभियंता व कार्यकारी अभियंता गंगापूर यांच्या मार्गदर्शनाखाली वाळुज येथील सहाय्यक अभियंता प्रणित खंडागळे, गंगापूर येथील सहाय्यक अभियंता गोविंद दुसंगे, परमेश्वर खंबाइतकर, काटेपिंपळगाव येथील कनिष्ठ अभियंता अमोल खंडागळे, तुर्काबाद येथील कनिष्ठ अभियंता मुफित शेख, सचिन केळकर, आनंद बरसावणे, राहुल सवने यांच्यासह वाळूज उपकेंद्र व गंगापूर तालुक्यातील वीज वितरण कंपनीचे उपअभियंता, सहाय्यक अभियंता व जनमित्र यांच्या पथकाने शनिवारी (ता.14) रोजी सकाळी वाळुज येथील हनुमंतगाव व साठेनगर येथे वीज चोरीची मोहीम सुरू केली. दरम्यान या कारवाईस नागरिकांनी तीव्र विरोध केला. यावेळी महावितरणचे अधिकारी व गावकरी यांच्यात बाचाबाची व हमारा तुमरी झाल्याने गावातील वातावरण तंग झाले होते. दरम्यान वाळूज पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेची नोंद वाळुज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत महावितरण कंपनीचे प्रणित खंडागळे यांनी सांगितले की, या वीज गळती व वीज चोरी कारवाईस विरोध केल्याने काही जणांविरुद्ध कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *