वाळूज महानगर, (ता.27) – कासोडा येथील एका विहिरीत अंदाजे 25 ते 30 वर्षीय तरुणाचा मृतदेह रविवारी (ता.27) रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास आढळून आला. मात्र हा खून आहे की, आत्महत्या याबाबत पोलीस संभ्रमात सापडले आहे. घटनास्थळावरून प्रत्यक्षदर्शी हा खून असल्याचे समजते.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कासोडा ते लवकी वस्ती दरम्यानच्या रस्त्यावर भिकन चत्रु पाटील हिवाळे यांचे गट क्रमांक 144 मध्ये शेत आहे. या शेतात कपाशी आणि मकाचे पीक आहे. या पिकांना पाणी भरण्यासाठी भिकन पाटील हिवाळे हे रविवारी (ता.27) रोजी सकाळी 7वाजता शेतात आले होते. विद्युत पंप सुरू केल्यानंतर त्यांनी शेतात पाणी भरत भरतांना 8 वाजेच्या सुमारास लाईट गेली. त्यामुळे त्यांनी विहिरीतील किती पाणी संपले ते डोकावून पाहिले असता विहिरीत पालथ्या अवस्थेत त्यांना एका तरुणाचा मृतदेह दिसला. त्यांनी ही माहिती तात्काळ वाळुज एमआयडीसी पोलिसांना दिली.
दरम्यान ही माहिती गावात पसरताच सरपंच संदीप मनोहर, उपसरपंच भारत गुंडाळे, संजय नवले, अनिल हिवाळे, विजय धोत्रे, भाऊसाहेब मते आदींसह गावकऱ्यांनी मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. मात्र विहिरी खोल आणि मृतदेह पालथ्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटू शकली नाही. दरम्यान वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अविनाश आघाव, सहायक पोलीस निरीक्षक गौतम वावळे, उपनिरीक्षक राहुल निर्वळ, संदीप शिंदे, सचिन पागोटे, ए आर इंगोले, अनिल भुसेवाड, विजय पाटील आदींनी धाव घेत प्रकरण वरिष्ठांच्या कानावर टाकले.
घटनास्थळावरून खून केल्याचा संशय –
दरम्यान कासोडा येथील ज्या विहिरीत मृतदेह आढळून आला. त्या विहिरीच्या काठाजवळ दुचाकी वळवल्याचे निशान आहे. त्यामुळे कोणीतरी अज्ञात आरोपींनी या अज्ञात इसमाचा काहीतरी कारणावरून खून करून मृतदेह दुचाकीवरून आणून या विहिरीत टाकला असावा. असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान वाळूज अग्निशमन दलाचे लक्ष्मण कोल्हे, परेश दुधे, अक्षय नागरे, शशिकांत गीते, भुरालाल सलामपुरे आदींनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. तसेच गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण वाघ, नवनाथ खांडेकर, संजय गावंडे, राहुल खरात, श्याम आढे, विजय घुगे, राजाराम डाखोरे, अजहर कुरेशी व स्वान पथकाचे पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल जवळकर, मच्छिंद्र तनपुरे, रवी वराडे यांनी टिपू या स्वानासह घटनास्थळी धाव घेत माग काढण्याचा प्रयत्न केला. मृतदेहाची ओळख पटविण्याचे व त्याने आत्महत्या केली की, त्याचा खून झाला. याबाबत पुढील एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरील क वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव करीत आहे.
