
वाळूजमहानगर (ता.31) – लोकशाही धोक्यात आहे जे सरकारच्या विरोधात बोलतात. त्यांना ईडी, सीबीआयच्या माध्यमातून धमकावले जाते. सत्तेसाठी विरोधकांना संपवायचे आणि जे आपल्या पक्षात येतील, त्यांना क्लिन चिट देऊन पाठीशी घालण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे असा आरोप सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलतांना रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केला.
रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर हे बेरोजगारी, महागाई, बदलते राजकारण आदी विविध प्रश्न घेऊन मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. ते छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आले असता ते ए.एस. क्लब येथे पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी विरोधी पक्षाने एकत्र येऊन सरकार विरुद्ध एक आघाडी उघडावी. असे आमचे प्रयत्न असल्याचेही सांगत यापुढे निवडणूक आयोगाने सर्व निवडणुका ईव्हीएम मशीनवर न घेता बॅलेट पेपरवर घ्याव्यात. अशी भूमिकाही आमची आहे.
कामगारांच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, सरकारने शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन वाळूज परिसरात एमआयडीसी सुरु केली. मात्र स्थानिकांना रोजगार देण्याऐवजी परराज्यातील लोकांना दिला जात आहे. हाताला काम नसल्याने स्थानिक माणूस रस्त्यावर आला आहे. स्थानिक लोकांना रोजगार मिळावा ही पक्षाची भूमिका आहे. येथील कारखानदार स्थानिकांना रोजगार देणार नसतील तर येणाऱ्या काळात त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशाराही यावेळी दिला. तसेच महागाई, बेरोजगारी आणि ईडी, सीबीआयचा होत असलेला दुरुपयोग यावरून केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टिका केली. यावेळी राष्ट्रीय सचिव संजीव बोदनकर, भैय्यासाहेब भालेराव, जिल्हाध्यक्ष काकासाहेब गायकवाड, मिलिंद बनसोडे, उद्योजक साबेर शहा, विनोद वाकोडे, के.एस. पवार, संजय गायकवाड, भीमराव त्रिभुवन, संजय बनसोडे, सुनील पांडे आदींची उपस्थिती होती.
