
वाळूजमहानगर, (ता.6) – विद्याभारती विद्यालय व रवींद्रनाथ इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने स्काऊट मास्टर अप्पासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शहीद भगतसिंह स्काऊट पथक व जिजाऊ गाईड पथक यांच्या वतीने सोमवारी (ता.6) रोजी एका आगळ्यावेगळ्या होलिका दहनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्षा भारती साळुंके तर प्रमुख पाहुणे म्हणून संचालक अक्षय हरकळ, समीर पठाण, अविनाश हिवाळे यांची उपस्थिती होती.
प्रथम स्काऊट गाईड पथकाचे ध्वजारोहण करण्यात येऊन व शालेय परिसराची स्वच्छता करून एकत्रित केलेल्या कचऱ्याच्या होळीचे पूजन केले. यावेळी स्काऊट गाईडच्या वतीने समाजात असलेल्या गरिबी, बेरोजगारी, अन्याय, अत्याचार, अहंकार, भ्रष्टाचार यासारख्या अनेक वाईट प्रवृत्तींचे बॅनर बनवून त्यांचे कचऱ्याच्या होळीत दहन केले. यावेळी संस्थाध्यक्षा भारती साळुंके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपण सर्वांनी वाईट प्रवृत्ती पासून दूर राहावयास हवे असे आवाहन केले तर स्काऊट मास्टर अप्पासाहेब मिसाळ यांनी होलीका दहणाचे पारंपारिक महत्त्व समजावून देताना पूर्वीपासून वाईट प्रवृत्तीवर सत्याने विजय मिळवलेला आहे. तेव्हा आपणही आपल्यातल्या वाईट प्रवृत्तींचे दहन करून आणि सत्त्याने वागण्याचा निर्धार करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असत पठाण यांनी तर आभार चेतन बोरोले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अविनाश हिवाळे, सविता कुलाल, प्रिया शिंदे, विनय लोकरे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
