March 23, 2026


वाळुजमहानगर, (ता.4) – सर्विस वायरचे आवरण निघाल्याने घरासमोर असलेल्या विद्युत खांबात आणि अर्थिंग मध्ये करंट उतरले. त्यामुळे 80 वर्षीय वृद्ध महिला ठार झाली. तर 17 वर्षीय युवती बालंबाल बचावली. महावितरणच्या निष्काळजीपणामुळे ही घटना वाळूज जवळील नायगाव येथे शुक्रवारी 4 जून रोजी सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास घडली. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाळुज औद्योगिक वसाहतीतील गरवारे कंपनीचा कामगार अशोक नाथू चव्हाण हा गरवारे कंपनीत काम करतो. तो नायगाव येथील सुभाष एकनाथ थोरात यांच्या घरात पत्नी गिरजा व दोन मुले अर्जुन आणि कृष्णा यांच्या समवेत राहतो.

अशोक चव्हाण याची आई तान्हाबाई नाथू चव्हाण (वय 80 वर्ष) रा. भेंडाळा या काही महिन्यापूर्वी अशोक यांच्याकडेच राहतात. त्यांच्या शेजारी बिबन पठाण यांचे घर आहे.

घराच्या समोर सिमेंट रस्ता असून चव्हाण यांच्या घराच्या डाव्या कोपऱ्यावर लोखंडी विद्युत खांब आहे. या विद्युत खांबावर परिसरातील अनेक घरांचे मीटर बसवण्यात आलेले आहेत. त्यासाठी आर्थिक दिलेली असून ती रस्त्याला खेटूनच आहे. त्यातील एका विद्युत मीटरच्या सर्विस वायरचे आवरण निघाल्याने त्यातील वीज प्रवाह आर्थिग आणि विद्युत पोलमध्ये उतरल्याने तान्हाबाई नाथू चव्हाण ही 80 वर्षीय वृद्ध महिला चिकटली.

हा प्रकार लक्षात येताच शेजारी राहणारी बारावीत शिकणारी 17 वर्षीय युवती मारिया बिबन पठाण ही मदतीसाठी गेली असता तिला सुद्धा विजेचा शॉक लागला. सुदैवाने ती दूर फेकल्या गेली. हा प्रकार लक्षात येताच दोघींनाही तात्काळ उपचारार्थ वाळूज येथे हलवण्यात आले. मात्र तोपर्यंत तान्हाबाई नाथू चव्हाण ही वृद्ध महिला मृत झाली. तर सुदैवाने मारिया बिबन पठाण ही युवती बालंबाल बचावली.

शुक्रवारी 4 जून रोजी सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे महावितरण विरोधात गावकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. त्यामुळे नायगाव येथील वातावरण तणावग्रस्त झाले होते. यावेळी महावितरण तसेच संबंधित ठेकेदाराविरुद्ध कारवाई करण्याची मागणी ही करण्यात आली.

दरम्यान वाळूज पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप वाघ, हेडकॉन्स्टेबल सुखदेव भागडे, पोलीस अंमलदार भीमराव शेळके, सतीश बर्वे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी पोलीस पाटील बाबासाहेब पगारे, सरपंच योगिता आरगडे,

युवा सेनेचे तालुका अधिकारी रमेश आरगडे, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण थोरात, योगेश दळवी, अनिल वाघ, देविदास श्रीमाळी, आशु शेख, बंडू जुमडे, प्रदीप सोनवणे, प्रकाश थोरात, सुभाष थोरात, लखन मिठे आदींची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *