वाळूजमहानगर ता.27 (बातमीदार) :- मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या शूरवीरांना श्रद्धांजली म्हणून वाळूज पोलीस ठाण्याच्या वतीने शनिवारी (ता.26) रोजी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात परिसरातील 34 जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
मुंबई येथे 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या हल्ल्यात अनेक शूरवीर पोलिसांसह अधिकारी अंकवाद्यांशी सामना करताना शहीद झाले होते. या घटनेतील शहिदांना श्रद्धांजली म्हणून प्रत्येक वर्षी 26 नोव्हेंबर रोजी श्रद्धांजली वाहण्यात येते. याचाच एक भाग म्हणून वाळूज पोलीस ठाण्याच्या वतीने शनिवारी (ता.26) रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करून मुंबई हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वाळूज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक शेळके, पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे, संदीप शेळके, नारायण बुट्टे, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुखदेव भागडे, दशरथ खोसरे, अभिमन्यू सानप, पोलीस अंमलदार किशोर साबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या रक्तदान शिबिरात परिसरातील नागरिकांसह पोलीस पाटील मिळून 34 जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. या रक्तदान शिबिरात लायन्स रक्तपेढीच्या वतीने डॉ. विद्या घोडके, जनसंपर्क अधिकारी मनोज चव्हाण, प्रयोगशाळा तंत्रज्ञ संदीप वाघमारे, भरत पाटणकर, सागर पंडित यांच्या टीमने रक्त संकलन केले.