March 23, 2026


वाळुजमहानगर, (ता.2) – एक घर, एक कुटुंब. मात्र मतदानासाठी वेगवेगळे मतदान केंद्र. हे सुद्धा घरापासून दूरवर. मतदानासाठी अत्यंत अचंबित करणारा हा प्रकार नुकत्याच जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदार यादीवरून उघडकीस आला. मतदार यादीची ही अनागोंदी पाहून वाळूज येथील नागरिकांनी थेट निवडणुकीवरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

निवडणूक प्रक्रिया सुखकर व्हावी, घराजवळच्या मतदान केंद्रावर मतदान करता यावे. असा निवडणूक विभागाचा नियम आहे. मात्र याच नियमाची पायमल्ली आल्याचे वाळूज येथे पहावयास मिळाले आहे. घर एकाच वार्डात, परंतु त्या घरातील मतदारांची नावे अनेक वार्डात अशी अवस्था नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या मतदार यादित वाळुजच्या मतदारांची झाली आहे. याचे दुष्परिणाम वाळुजकरांनी वाळुज ग्रामपंचायत निवडणुकीत भोगले आहेत. मतदार यादीत नावे न सापडल्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत मोठी घसरणही झाली होती. हा अनुभव लक्षात घेता पुन्हा याची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून संपूर्ण वाळुजकरांनी आगामी निवडणुकात मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

ही अवस्था कुण्या एका वार्डाची नसून संपूर्ण वाळुज गावातील मतदारांची आहे. येथील शिवाजीनगर परीसरातील अनेक वर्षापासून रहिवासी असलेल्या नागरीकांच्या एकाच कुटुंबातील नावे अनेक वार्डात विखुरलेले आहेत. लोकसभा निवडणूकसाठीची मतदार यादी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. या यादीमध्ये कुटुंबप्रमाणे नाव यादीत दिसून येत नाही. कुटुंब प्रमुखाचे नाव एका यादीत तर त्याच व्यक्तीच्या पत्नीचे नाव दुसऱ्या यादीत. आणि मुलाचे नाव तिसऱ्याच यादीत असल्याचे दिसून येत आहे. या अनागोंदीमुळे एकाच कुटुंबातील मतदारांना वेगवेगळ्या मतदान केंद्रावर अधिकचा वेळ खर्च करून मतदान करण्याची वेळ येणार आहे. त्यासाठी मोठा मनस्ताप होणार आहे. म्हणून वाळुज येथील मतदारांनी जिल्हाधिकारी व निवडणूक विभागाला तक्रार देऊन जोपर्यंत कुटुंब निहाय नावे यादीत येत नाही, तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही. म्हणजेच मतदानावर बहिष्कार टाकण्याचा स्पष्ट व ठाम निर्णय घेतला आहे.
घराजवळच्या मतदान केंद्रात मतदान करावे. असे निवडणूक विभागाकडून सांगितल्या जात आहे, नव्हे तसा नियमच आहे. मात्र वाळूज येथील नागरिकांना हा नियम लागू होत नाही का? असा प्रति प्रश्नही मतदाराने उपस्थित केला आहे. कुटुंबनिहाय मतदार यादी तयार करून जवळच्याच मतदान केंद्रावर मतदान करता यावे. अशी व्यवस्था निवडणुक विभागाने वाळूज येथील मतदारांना उपलब्ध करून द्यावी. घरापासून मतदान केंद्र दूर असल्याने मतदानाच्या मूलभूत अधिकाराचे यामुळे हनन होत आहे. वाळुज गावाची मतदारांची संख्या जवळजवळ 20 हजार असुन घरापासून दूर असलेल्या मतदान केंद्रापर्यंत पोहचायला मतदारांची हेळसांड होत आहे. त्यात अपंग (दिव्यांग) मतदारांची तर अत्यंत हेडसांड होते.
निवडणुकीवर बहिष्कार
निवडणूक पारदर्शकपणे व्हावी. अशी सामान्य नागरिकांची ईच्छा आहे. म्हणून निवडणूक विभागाकडून जोपर्यंत मतदार यादी दुरूस्ती होणार नाही, तोपर्यंत आम्ही निवडणूकीवर बहिष्कार टाकत आहोत. असे निवडणूक विभागाला दिलेल्या एका तक्रारीत म्हटले आहे.
जिल्हाधिकार्यांकडून तात्काळ दखल
मतदार यादीतील अनागोंदीची तक्रार घेऊन रोहित तुकाराम जाधव रा.वाळुज हे वैजापूर ऊपविभागीय कार्यालयात व तहसील कार्यालयात गेले होते. तोपर्यंत या तक्रारीबाबतचा जिल्हाधिकारी कार्यालयाचा मेल गंगापूर तहसील कार्यालयात पोचला असल्याची माहिती रोहित जाधव यांना संबंधितांनी दिली असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेली मतदार यादी किती दिवसात व कितपत दुरुस्त होते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
न्यायालयात जाणार
मतदान करणे हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. मी वाळूज गावचा एक नागरिक म्हणून
हे प्रकरण शासनाने व्यवस्थितरित्या हाताळले नाही, तर आम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोठवणार असल्याचे एडवोकेट शंतनू धुमाळ यांनी सांगितले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *