
वाळूज महानगर, (ता.31) – वाहनधारकांविरोधात कठोर समजल्या जाणाऱ्या ‘हिट अँड रन’ कायद्याचे उल्लंघन केल्याची घटना वाळूज परिसरातील जोगेश्वरी ते रांजणगाव (शेणपुंजी) रोडवर गुरुवारी 31 जुलै रोजी दुपारी घडली. या घटनेत नऊ जण जखमी झाले. परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
हीट अँड रन हा कायदा वाहनधारकांसाठी अत्यंत कठोर असल्याने या कायद्याला वाहन चालक आणि मालकांनी कडाडून विरोध केला होता. हा कायदा रद्द व्हावा म्हणून आंदोलने ही करण्यात आली. वाहनधारकांसाठी हा कायदा कडक असला तरी तो जनमाणसासाठी अत्यंत दिलासादायक मानल्या जातो. 
अपघाता सारख्या घटना टाळण्यासाठी हा कायदा करण्यात आलेला असताना सुद्धा अनेक वाहनधारक हिट अँड रन या कायद्याचे पालन करताना दिसून येत नाही. विशेष म्हणजे वाळूज परिसरात या कायद्याचे सर्रासपणे उल्लंघन होताना दिसून येते.
त्याचाच प्रत्यय गुरुवारी 31 जुलै रोजी दुपारी आला. त्याचे झाले असे की, क्रुझर जीप (एम एच 13, ए सी-9589) च्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव व निष्काळजेपणे चालवून पादचारी कामगारांसह दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनांना धडक दिली. या अपघातात नऊ जण जखमी झाले.
या अपघातात धडक देणाऱ्या क्रुझर जीपचे व धडक बसणाऱ्या वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जखमीमध्ये काही जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचाही समावेश असल्याचे समजते. जखमीपैकी चार जण गंभीर जखमी आहेत. वाळूज औद्योगिक वसाहतीतील जोगेश्वरी ते रांजणगाव (शेणपुंजी) रोडवर घडलेल्या या ‘हिट अँड रन’ च्या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
चालक पोलिसांच्या ताब्यात –
दरम्यान हिट अँड रन या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या क्रुझर चालकास काही दक्ष नागरिकांनी अडवून पुरुष व्यक्त केला. तसेच त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. सध्या तो वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याची हवा खात आहे. संजय बाबुराव कदम वय 40, राहणार जोगेश्वरी असे त्याचे नाव व गाव आहे.
