
वाळूजमहानगर, (ता.29) – मित्राची कार घेऊन आईला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी निघालेल्या एका तरुणाचे कारवरील नियंत्रण सुटले. आणि बस थांबल्यावरील दोघांना चिरडत कार शहर बसला पाठीमागून धडकली. ही हीट अँड रन ची घटना वाळूज औद्योगिक वसाहतीतील रांजणगाव फाट्यावर गुरुवारी (ता.27) रोजी सायंकाळी घडली.

याबाबत पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीचा आशय असा, बजाजनगर येथील मोहन संजय बोराडे याने त्याचा मित्र अक्षय सोनवणे याची स्वीफ्ट कार (एमएच 14,सीएक्स -8289) घेऊन आईला रुग्णालात घेऊन जाण्यासाठी घरी जात होता. तो रांजणगाव फाटा येथे येताच त्याचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ही कार रांजणगाव (शेणपुंजी) फाट्यावर उभ्या असलेल्या दोघांना चिरडून शहर बसला पाठीमागून धडकली. गुरुवारी (ता.27) रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात कारचा चुराडा होऊन ज्ञानेश्वर बाबुराव गव्हणे (वय 45) रा.रांजणगाव पवननगर व दशरथ सोनाजी म्हात्रे (वय 71) रा.अकोला या दोघांना जोराची धडक दिली. ही कार इतक्या वेगात होती की, गव्हाणे व म्हात्रे या दोघांना चिरडून ती समोर उभ्या असलेल्या मनपाच्या शहर बस (एमएच 20, ईएल-1923) ला पाठीमागून धडकली.

या भीषण अपघातात ज्ञानेश्वर गव्हणे गंभीर जखमी होऊन जागेवरच बेशुध्द झाला. तर दशरथ म्हात्रे हा गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाला. त्यांना काही दक्ष नागरीकांनी उपचारार्थ घाटीत दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघाताप्रकरणी ज्ञानेश्वर गव्हाणे व मनपा शहरबसचा चालक मनोज भिमराव सोनवणे यांनी दिलेल्या वेगवेगळ्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
