वाळूजमहानगर, (ता.13) – महायुती आणि महाविकास आघाडीसाठी अत्यंत महत्त्वाची व प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह वाळूज परिसरातही सोमवारी (ता.13) रोजी मतदान घेण्यात आले. मात्र या निवडणूकीत मतदारांनी निरुत्साह दाखवल्याने मतदानाचा टक्का चांगलाच घसरला. ही टक्केवारी छप्पनच्या आत सिमटली.
औरंगाबाद लोकसभा 19 साठी सोमवारी (ता. 13) रोजी मतदान घेण्यात आले. या मतदानासाठी वाळूज परिसरातील एमआयडीसी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या एकोणावीस गावात चौक व्यवस्था करण्यात आली होती. या निवडणुकीसाठी तिसगाव येथे 8, वडगाव (कोल्हाटी) 11, बजाजनगर 31, साजापूर 4, पंढरपूर 7, आंबेगाव 1, खोजेवाडी 1 टोकी 1, नांदेड 1 नारायणपूर 1, घाणेगाव 4, रांजणगाव (शेणपुंजी) 31, कमळापूर 6, एकलहरा 2, विटावा 2, आंबेलोहळ 3, जोगेश्वरी 9, वडगाव (रामपुरी) 1, आणि कासोडा 2 असे एकूण 125 बूथ वरून मतदान घेण्यात आले.
मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी शासनाच्या वतीने विविध प्रकारची जनजागृती केली. मात्र मतदारांनी या निवडणुकीसाठी निरुत्साह दाखवला. काही अपवादात्मक मतदान केंद्र वगळता अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर शुकशुकाट होता. सकाळी आणि सायंकाळ नंतर मतदारांच्या रांगा लागल्या मात्र तोपर्यंत वेळ संपली होती त्यामुळे अनेकांना मतदान न करता माघारी फिरावे लागले. परिणामी मतदानाची टक्केवारी 56 वरच सिमटली.
केंद्रावर कार्यकर्त्यांचीच गर्दी –
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी वाळूज परिसरात प्रमुख तीन पक्षांमध्येच लढत झाली. मतदारांच्या सुविधेसाठी मतदान केंद्राबाहेर राजकीय पक्षाच्या वतीने मंडप व खुर्च्या टाकून पोलचिटची व्यवस्था केली होती. मतदार आला की, हे कार्यकर्ते मतदाराला गराडा घालून मतदानासाठी याचना करत होते. ही गर्दी इतकी वाढली होती की. मतदान केंद्रासमोर मतदारांपेक्षा कार्यकर्त्यांचीच गर्दी दिसून आली.
अनेक कामगार मतदानापासून वंचित-
पवित्र मतदानाचा हक्क प्रत्येक कामगारांना बजावता यावासाठी निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार बहुतांश कारखान्यातील कामगारांना पगारी सुट्टी देण्यात आली होती. मात्र अनेक कंपन्यांनी सुट्टी न देता मतदानासाठी दोन ते तीन तासाची सूट दिली होती. या वेळात मतदान करणे शक्य नसल्याने अनेक जण मतदानाच्या पवित्र हक्कापासून वंचित राहिले.
दिव्यांगाचे उस्फुर्त मतदान –
वाळूज परिसरात दिव्यांग मतदारांची संख्या बऱ्यापैकी आहे. या मतदारांपैकी जवळजवळ 80 टक्केच्या वर दिव्यांग बांधवांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावत मतदानाची टक्केवारी वाढवण्याचा. प्रयत्न केला.
दुपारनंतर लागल्या रांगा –
वाळुज परिसरातील अनेक मतदान केंद्र बाहेर कडाक्याचे ऊन असल्याने अनेक जण घराबाहेर निघाले नाही. सकाळी अनेकांनी कोवळ्या उन्हात मतदानासाठी गर्दी केली. त्यामुळे काही काळ रांगा लागल्या होत्या. त्यानंतर दुपारी चार वाजेनंतर व कंपनीतील कामगार सुटल्यानंतर मतदान केंद्राबाहेर मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. मात्र तोपर्यंत मतदानाची वेळ संपली होती. काही कामगार मतदानाची वेळ संपल्यानंतर केंद्रावर आल्याने पोलिसांनी त्यांना माघारी पाठवले.
नेत्यांनी घेतला मतदानाचा आढावा –
मतदान प्रक्रिया सुरू असताना अनेक राजकीय नेत्यांनी मतदान केंद्राला भेटी मतदानाचा कल व टक्केवारीचा आढावा घेतला. यामध्ये प्रामुख्याने
महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार प्रशांत बंब, आ. संजय शिरसाट आदींचा समावेश होता.
बालकांसाठी पाळणाघर –
लोकशाही मजबूत करण्यासाठी पुरुषांबरोबरच महिलांचाही मोठा वाटा आहे. त्यामुळेच मतदान करण्यासाठी महिला वर्ग मोठ्या प्रमाणात बाहेर पडतो. अशावेळी तहान मुलांची गैरसोय होऊ नये म्हणून मतदान केंद्रावर पाळणा घराची व्यवस्था करण्यात आली होती. या पाळणाघराचा वाळूज येथे जवळजवळ 25 बालकांनी लाभ घेतला.
कमळापुरात उशिरापर्यंत मतदान –
वाळूज परिसरातील कमळापूर येथे मतदानासाठी 6 मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती. हा परिसर कामगार बहुल असल्याने कामगार कंपनीतून सुटल्यानंतर सायंकाळी मतदान केंद्रावर रांगा लागल्या. 5.50 वाजता या मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा होत्या. त्यामुळे या केंद्रावर मतदानाची वेळ संपल्यानंतर सुद्धा मतदान प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.
पोलिसांचा चोख बंदोबस्त –
मतदानादरम्यान वाळुज एमआयडीसी पोलिसांनी परिसरातील सर्वच मतदान केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवला. दरम्यान कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. दिवसभर शांततेत व सुरळीत मतदान झाले.