February 5, 2026

वाळुज महानगर, (ता.16) – वाळूज परिसरात दुचाकी व चारचाकी बरोबरच आता सायकल चोरांनी थैमान घातले आहे. त्यामुळे विशेषतः शाळकरी मुलांमधून कमालीचा संताप व्यक्त होत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही सायकल चोरी भर दिवसा होत आहे.

मात्र पोलिसांचा ससेमीरा टाळण्यासाठी नागरिक तक्रार दाखल करत नसल्यामुळे चोरट्यांचे मनोबल अधिक वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. अशीच एक घटना वडगाव–तिसगाव रोडवरील सिडको वाळूज महानगर परिसरातील साई रेजन्सी सोसायटीत घडली. याचे चित्रण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, गणेश कचकुरे हे कुटुंबासह साई रेजन्सी सोसायटीमध्ये राहतात. 14 जानेवारी रोजी त्यांच्या मुलाने नेहमीप्रमाणे फ्लॅटसमोर सायकल लावली होती. मात्र काही वेळानंतर सायकल लावलेल्या ठिकाणी आढळून आली नाही.

परिसरात शोध घेतला असता सायकल कुठेही सापडली नाही. त्यानंतर सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता, दुपारी सुमारे 12:30 वाजताच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीने सायकल चोरून नेल्याचे स्पष्ट दिसले. हा प्रकार लक्षात येताच गणेश कचकुरे यांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध सुरू केला असून, परिसरातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *