
वाळूजमहानगर, (ता.22) – अयोध्या येथील गेल्या 500 वर्षांपासून रखडलेल्या राम मंदिराचा प्रश्न मार्गी लागून भव्य राम मंदिराचे उद्घाटन व प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठेनिमित्त वाळूज परिसरात सडा, रांगोळी, भव्य मिरवणूक, राम नाम जप, दीपोत्सव, महाआरती, महाप्रसाद तसेच बुंदी व लाडू वाटपासह विविध धार्मिक कार्यक्रमाने प्रभू श्रीरामाचा गजर करत रामोत्सव सोमवारी (ता.22) रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी झालेल्या भक्तिमय वातावरणात ‘भारत का बच्चा-बच्चा जय जय श्रीराम बोलेगा’ हे गाणे प्रत्येयास आले.
अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन होऊन प्रभू श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्याने भारतभरातील राम भक्तामध्ये मोठा उत्साह संचारला. आणि सर्वत्र मोठ्या उत्साहात व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून रामोत्सव साजरा सुरू झाला.
वाळुज परिसरातील बजाजनगर, सिडको वाळूज महानगर, वडगाव (को.), तिसगाव, कमळापूर, रांजणगाव (शेणपुंजी) येथील सर्व मंदिर फुलांच्या राशीने व लाइटिंग ने उजाळून निघाले होते. सर्वच मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. ठिकठिकाणी रामभक्तच्या वतीने श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करून सामुदायिक महाआरत, महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
