वाळूजमहानगर, (ता.26) – गेल्या चार दिवसापासून असलेल्या ढगाळ वातावरणानंतर रविवारी (ता.26) रोजी रात्री नऊ वाजेनंतर बेमौसमी पावसाने जोरदार हजेरी लावली. परिणामी या पावसामुळे बांधकाम व्यवसायिक व शेतकरी अशा अनेकांची त्रिधातिरपट उडाली.
गेल्या चार दिवसापासून अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होते. त्यामुळे बेमौसमी पावसाची शक्यता वर्तविली जात असल्यामुळे शेतकरी शेतातील उभे पीक कापूस वेचून घेणे, सोंगलेली मका झाकून ठेवणे. अशा प्रकारे पीके सुरक्षित करण्याच्या कामाला लागले होते. रविवारी (ता.26) रोजी रात्री नऊ वाजेच्यानंतर आकाशात विजेचा लखलखाट होऊन पावसाला जोरदार सुरुवात झाली. या पावसामुळे वाळुज परिसरातील रस्ते पाणीच पाणी झाले होते. वाळूज परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. या पावसात बांधकाम साहित्यासह सिमेंट ओले झाले. त्यामुळे शेतकऱ्यांसह बांधकाम करणाऱ्या अनेकांची त्रेधातिरपट उडाली. दुष्काळाच्या दृष्टीने हा पाऊस योग्य मानला जात असला तरी शेतात उभ्या असलेल्या कापूस, मका, कांद्याचे रोपे यांचे नुकसान करणारा आहे.
मात्र अन्य पिकांसाठी हा पाऊस भविष्यातील पाणीटंचाई निवारणासाठी उपयुक्त आहे. अनेक ठिकाणी हा पाऊस अवकाळी झाला. तर बऱ्याच ठिकाणी गारा पडल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान या जोरदार पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता.

